Indians In Singapore Racist Attack : नेपाळ-तिबेट येथील विनाशकारी पूर आणि सिंगापूर एअरलाइन्स-एअर इंडिया भागीदारीनंतर ऑनलाईन समोर आलेल्या वर्णद्वेषी टिप्पण्यांवर सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याह अनेकांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. माध्यमांशी बोलताना सिंगापूरचे गृहमंत्री के. शन्मुगम म्हणाले, “अशी बातमी आहे की एअर इंडिया सिंगापूर एअरलाइन्ससारख्या भागधारकांकडून नवीन गुंतवणूक करणार आहे. यामुळे ऑनलाईन भारत-विरोधी वर्णद्वेषी टीकेला उधाण आले आहे. उदाहरणार्थ, साप, कढी (करी), काळी जादू आणि पराठे असे संदर्भ वापरले जात आहेत.” हिंदूस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

शिवाय, गृहमंत्र्यांनी यावर भर दिला की विदेशी सोशल मीडिया खाती सिंगापूरमधील भारतीयांविरुद्ध वर्णद्वेषाला खतपाणी घालत आहेत. “अलीकडच्या काळात, विशेषतः सिंगापूरमधील भारतीयांबद्दल अधिक वर्णद्वेषी टिप्पण्या वाढल्याचं दिसून येत आहे. यातील काही टिप्पण्या परदेशातून सुरू झाल्या आहेत आणि तिथूनच त्यांना प्रोत्साहन दिले गेले आहे”, असं शन्मुगम म्हणाले. ते पुढे म्हणाले, “आपण एक अतिशय लहान, बहुवंशीय आणि बहु-धार्मिक देश आहोत. जर आपण वंशाच्या किंवा धर्माच्या आधारावर विभागलो गेलो, तर सिंगापूरला मजबूत करणारी आपली एकता आपण गमावून बसू. यामुळे लोकांमध्ये द्वेष आणि संशयाची भावना निर्माण होईल.”

ऑनलाईन वर्णद्वेषी टिप्पण्यांची पोलीस चौकशी

नेपाळ-तिबेट आपत्ती आणि सिंगापूर एअरलाइन्सच्या (SIA) एअर इंडियामधील गुंतवणुकीबाबत ऑनलाईन आलेल्या लज्जास्पद वर्णद्वेषी टिप्पण्यांची अधिकारी चौकशी करत असल्याचे शन्मुगम यांनी यापूर्वीच सांगितले होते. वरिष्ठ मंत्र्यांनी या टिप्पण्यांचा लज्जास्पद, घाणेरड्या आणि पूर्णपणे अस्वीकारार्ह म्हणून तीव्र निषेध केला आणि माध्यम संस्थांना अनेक टिप्पण्या काढून टाकाव्या लागल्याचं नमूद केलं. चॅनल न्यूज एशियाने शन्मुगम यांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, “माध्यमांनी मला सांगितलं की त्यांना बऱ्याच टिप्पण्या काढून टाकाव्या लागल्या कारण त्या अत्यंत घाणेरड्या होत्या. या सर्व टिप्पण्या सिंगापूरच्या नागरिकांनीच केल्या आहेत की नाही हे मला माहित नाही. पण मी एवढेच म्हणेन या टिप्पण्या लज्जास्पद, घाणेरड्या आणि पूर्णपणे अस्वीकारार्ह आहेत. मी पोलिसांना या टिप्पण्यांची चौकशी करण्यास सांगितले आहे.”

‘ऑनलाईन एक विद्रूप बाजू समोर आली’

फेसबुकवरील एका पोस्टमध्ये, सिंगापूरच्या पंतप्रधानांनी यावर भर दिला की, जरी सखोल आणि सडेतोड चर्चेला प्रोत्साहन दिले जात असले, तरी कायदेशीर चर्चांचा वापर कधीही कोणत्याही समुदायाविरुद्ध किंवा परदेशी नागरिकांविरुद्ध पूर्वग्रह किंवा शत्रुत्व पसरवण्यासाठी केला जाऊ नये. ऑनलाईन संवादाची एक विद्रूप बाजू समोर आल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. शिवाय, वोंग यांनी चेतावणी दिली की या विषारी भावनांना केवळ निरुपद्रवी ऑनलाईन गप्पा म्हणून दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही. “दुर्दैवाने, आपल्याला ऑनलाईन एक विद्रूप बाजू समोर आलेली पाहायला मिळाली आहे. नेपाळमधील विनाशकारी पूरानंतर, अजूनही बेपत्ता असलेल्या सिंगापूरच्या नागरिकांबद्दल वर्णद्वेषी टिप्पण्या करण्यात आल्या. अलीकडेच, एअर इंडियामधील सिंगापूर एअरलाइन्सच्या गुंतवणुकीबाबतच्या प्रश्नांसोबत भारत-विरोधी अपशब्दांचा वापर करण्यात आला”, असं वोंग यांनी नमूद केले.