मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यायला हवा कारण त्यांनी मतचोरीसाठी सरकारला मदत केली आहे हे म्हणत मागील आठवड्यापासून इंडिया आघाडीने, सीजेपी यांनी आंदोलन सुरू केलं आहे. १० ऑक्टोबरला कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन दिल्लीत होणार होतं त्या दिवशी दिल्लीत अनेक नेते आणि कार्यकर्ते यांना ताब्यात घेण्यात आलं. ११ ऑक्टोबरलाही अशीच धरपकड पाहण्यास मिळाली. आता आज इंडिया आघाडी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा घेऊन जाणार आहे. या मोर्चाच्या आधी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

शशी थरूर यांनी केलेली पोस्ट काय?

शशी धरुर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये रामधारी सिंह दिनकर यांची एक कविता लिहिली आहे. दिनकर यांची जनतंत्र का जन्म ही कविता प्रसिद्ध आहे. हीच कविता शशी थरूर यांनी पोस्ट केली आहे. शशी थरूर म्हणतात, “लेकीन होता भूडोल, बवंडर उठते है, जनता जब कोपा कुल हो भृकूटि चढाती है. दो राह, समय के रथ का घर्घर-नाद सुनो, सिंहासन खाली करो की जनता आती है” दिनकर यांच्या कवितेच्या ओळी शशी थरूर यांनी पोस्ट केल्या आहेत. तसंच त्यांनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी मोर्चाची माहिती दिली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख पक्षांसह काँग्रेस थेट सरन्यायाधीश सूर्य कांत यांची भेट घेण्यासाठी मोर्चा काढणार आहे. मात्र, एकीकडे मोर्चासाठी विरोधक सज्ज होत असतानाच दुसरीकडे सरन्यायाधीशांनी यासंदर्भात विरोधकांना भेटण्यासाठी नकार दिला आहे. आता यावरून राजकारण तापलं आहे. इंडिया आघाडीचे नेत्यांनी या प्रकरणी सरन्यायाधीशांवर टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनीही ही बाब दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. इंडिया आघाडीचा मोर्चा सर्वोच्च न्यायालयावर जाणार आहे. राहुल गांधी सरन्यायाधीश सूर्य कांत यांची भेट मागितली होती. आज संध्याकाळी ४ ते ५ च्या दरम्यान ते भेटणार असं ठरलं होतं. पण राजकीय नेत्यांना भेटण्याचा आपल्याला अधिकार नाही अशा प्रकारची भूमिका जेव्हा देशातल्या नागरिकांना धक्का बसला आहे. प्रत्येक संविधानिक संस्थेवर मोदी आणि अमित शाह यांनी त्यांची माणसं बसवलं आहे. यामुळे शेवटचा उपाय म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांना भेटणार असतो तेव्हा तेदेखील चर्चेचा दरवाजा बंद करत आहेत. हे या देशाचं आणि संविधानाचं दुर्दैव आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.