सिंघू बॉर्डरवर हत्या करणारा सरवजीत म्हणतो, “मला अजिबात खंत नाही”; कोर्टाने सुनावली सात दिवसांची कोठडी

सिंघू बॉर्डरवर झालेल्या हत्येप्रकरणी सरवजीत सिंग याने पोलिसांकडे आत्मसमर्पण करत जबाबदारी स्वीकारली आहे

Singhu Border Lynching, Singhu Lynching, Nihang, Farmer Protest, Lakhbir Singh, Saravjit Singh
सिंघू बॉर्डरवर झालेल्या हत्येप्रकरणी सरवजीत सिंग याने पोलिसांकडे आत्मसमर्पण करत जबाबदारी स्वीकारली आहे

सुमारे वर्षभर शेतकरी आंदोलनामुळे देशभरात एक ठिकाण चर्चेत आहे ते म्हणजे हरियाणा-दिल्लीमधील सिंघू सीमारेषा…पण याच ठिकाणी शुक्रवारी एक मृतदेह आढळला आणि एकच खळबळ उडाली. या ठिकाणी एका व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या व्यक्तीचा एक हात दोरखंडांनी बांधला होता, दुसरा हात मनगटापासून कापण्यात आला होता. या हत्येमागे निहंग शिखांचा गट जबाबदार असल्याचा संशय व्यक्त होता होता. दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी निहंग सरवजीत सिंग याने पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. त्याने या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून आज कोर्टात हजर करण्यात आलं.

दरम्यान सरवजीत सिंग याने हत्या केल्याबद्दल आपल्याला कोणतीही खंत नसल्याचं म्हटलं आहे. सरवजीत सिंग याला कोर्टात हजर करण्यात आलं असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी कोर्टात १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. सरवजीतने इतर चार आरोपींची नावं दिली असून त्यांच्याकडून शस्त्र जप्त करायची असल्याचं पोलिसांकडून यावेळी सांगण्यात आलं.

सिंघू बॉर्डरवर इतक्या क्रूरपणे हत्या कशासाठी? हत्येमागे नेमका कोणचा हात?; जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं

पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याआधीचा सरवजीतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो इतर निहंगा त्याच्या अवतीभोवती दिसत आहेत. यामधील किमान दोघांच्या हातात तलवारी होत्या. यावेळी एका पत्रकाराने सरवजीतला तुम्हाला पश्चाताप होतोय का? अशी विचारणा केली. यावर सरवजीत सिंग उत्तर देण्यास उत्सुक नव्हता. मात्र त्याने आपलं डोकं हलवत नाही असं उत्तर दिलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलीस स्थानकात माहिती देण्यात आल्यानंतर पहाटे पाच वाजता मृतदेह आढळला. पोलिसांना यावेळी पुरावे सापडले होते. तसंच फॉरेन्सिक टीमकडून संपूर्ण परिसराची चाचपणी करण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव लखबीर सिंग असून पंजाबच्या तारतरण जिल्ह्यातील आहे. दलित असणारे लखबीर सिंग मजूर होते. ३५ वर्षीय लखबीर सिंग यांना आई-वडिलांच्या मृत्यूनंतर काकाने दत्तक घेतलं होतं. त्यांच्या मागे पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. सर्वात मोठी मुलगी १२ वर्षाची आणि लहान मुलगी आठ वर्षाची आहे.

पोलिसांच्या हाती व्हिडीओ

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लखबीर सिंगभोवती उभ्या राहिलेल्या निहंग गटातील काही व्यक्ती त्याला जाब विचारत असल्याचे व्हिडीओ पोलिसांना मिळाले आहेत. एका व्हिडीओत लखबीर सिंगचा हात कापलेला असून त्यातूर रक्त वाहत असताना लोक तिथे उभे असल्याचं दिसत आहे.

यावेळी काही लोकांच्या हातात भाले दिसत आहेत. हे लोक त्याला त्याचं नाव विचारत होते. तर इतर लोक लखबीर सिंगला (मृत आहे की जिवंत स्पष्ट नाही) उलटं लटकवताना दिसत आहेत. तिसऱ्या व्हिडीओत लखबीर सिंग शेवटच्या घटका मोजत असताना काहीजण त्याच व्हिडीओ शूट करताना दिसत आहेत. या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली जात आहे. या व्हिडीओंच्या आधारे ही हत्या निहंग गटाने केल्याचा दावा पोलिसांनी केला.

हत्येचं कारण काय?

दरम्यान ‘गुरु ग्रंथ साहिब’ची प्रत उचलून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला आम्ही पकडले. त्याला सिंघू सीमेवर कोणी पाठवले याची विचारणाही केली. त्यानंतर आम्ही त्याचे पाय मोडले आणि हात कापून टाकला. मग त्याला बांधून ठेवले. ज्याने या व्यक्तीला पाठवले त्यालाही आम्ही ठार मारू, असे निहंग गटातील व्यक्ती सांगत असल्याचा व्हिडीओही पोलिसांनी जप्त केला आहे. लखबीर सिंगचा मृतदेह बॅरिकेडला बांधून ठेवण्यात आला होता.

संयुक्त किसान मोर्चाने निवेदन

“पंजाबमधील तरणतारण जिल्ह्य़ातील लखबीर सिंग याच्या हत्येची जबाबदारी घटनास्थळावरील निहंग गटाने घेतली आहे. मृत व्यक्ती तसेच निहंग गटाशी संयुक्त किसान मोर्चाचा काहीही संबंध नाही. कोणत्याही धार्मिक ग्रंथाचा अपमान करणे योग्य नाही हीच मोर्चाची भूमिका आहे. पण कोणालाही कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार नाही. धर्मग्रंथाचा अपमान आणि झालेली हत्या या दोघांमागील षड्यंत्राचा कसून तपास झाला पाहिजे व कटातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासंदर्भात होणाऱ्या कोणत्याही कायदेशीर चौकशीसाठी पोलीस व स्थानिक प्रशासनाला मोर्चा सहकार्य करेल,” असे संयुक्त किसान मोर्चाने निवेदनात स्पष्ट केले.

मोर्चाच्या सुकाणू समितीचे सदस्य योगेंद्र यादव यांनीही दृक्श्राव्य फीत प्रसिद्ध करून हत्येचा निषेध केला व निहंग गटाचा शेतकरी आंदोलनाशी संबंध नसल्याचे जाहीर केले. हे शेतकऱ्यांचे आंदोलन असून धार्मिक नव्हे, तुम्हाला आंदोलनात स्थान नाही, हे शेतकरी नेत्यांनी निहंग गटाला सातत्याने सांगितले आहे. पण तरीही हा गट सिंघू सीमेवर ठिय्या देऊन बसला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन आत्तापर्यंत शांततेने झाले असून इथे हिंसेला जागा नाही, असे यादव यांनी नमूद केले. शेतकरी आंदोलनाला धार्मिक बनवण्याचा प्रयत्न केला जात असून ही हत्या कट-कारस्थानाचा भाग असल्याचा संशय मोर्चाचे नेते जगजीत सिंग दल्लेवाल यांनी व्यक्त केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Singhu border lynching nihang who claimed brutal killing at farmers protest says no regrets sgy

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या