Singhu lynching: खिशात फक्त ५० रुपये घेऊन लखबीर दिल्लीत गेले होते, आता त्यांच्या मुलांचं काय होणार? कुटुंबाचा आक्रोश

सुमारे वर्षभर शेतकरी आंदोलनाचे प्रमुख ठिकाण बनलेल्या सिंघू सीमेवर शुक्रवारी एका व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली

Singhu lynching, Lakhbir,
सुमारे वर्षभर शेतकरी आंदोलनाचे प्रमुख ठिकाण बनलेल्या सिंघू सीमेवर शुक्रवारी एका व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली

सुमारे वर्षभर शेतकरी आंदोलनाचे प्रमुख ठिकाण बनलेल्या सिंघू सीमेवर शुक्रवारी एका व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली. या हत्येमागे निहंग शिखांचा गट जबाबदार असल्याचा संशय व्यक्त असून या गटातील व्यक्ती सातत्याने आंदोलनस्थळी वावरत असल्याने शेतकरी संघटनांवरही दबाब वाढू लागला आहे. या हत्येचा संयुक्त किसान मोर्चातील नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून निहंग गटाचा आंदोलनाशी कोणताही संबंध नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले.

लखबीर सिंग असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. लखबीर सिंग यांच्या हत्येमुळे त्यांच्या मुलांचं काय होणार अशी चिंता आता कुटुंबाला सतावत आहे. पंजाबमधील तरणतारण जिल्ह्य़ातील लखमबीर सिंग खिशात फक्त ५० रुपये घेऊन दिल्लीत गेले होते अशी माहिती कुटुंबाने दिली आहे.

सिंघू सीमेवर निर्घृण हत्या ; चौकशीची संयुक्त किसान मोर्चाची मागणी

आंदोलनस्थळी शुक्रवारी पहाटे पाच वाजता लखबीर सिंग ही व्यक्ती पोलिसांना मृत अवस्थेत सापडली. या व्यक्तीचा एक हात दोरखंडांनी बांधला होता, दुसरा हात मनगटापासून कापण्यात आला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लखबीर सिंगभोवती उभ्या राहिलेल्या निहंग गटातील काही व्यक्ती त्याला जाब विचारत असल्याच्या चित्रफिती पोलिसांना मिळाल्या. या फितींच्या आधारे ही हत्या निहंग गटाने केल्याचा दावा पोलिसांनी केला. ‘गुरु ग्रंथ साहिब’ची प्रत उचलून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला आम्ही पकडले. त्याला सिंघू सीमेवर कोणी पाठवले याची विचारणाही केली. त्यानंतर आम्ही त्याचे पाय मोडले आणि हात कापून टाकला. मग त्याला बांधून ठेवले. ज्याने या व्यक्तीला पाठवले त्यालाही आम्ही ठार मारू, असे निहंग गटातील व्यक्ती सांगत असल्याची चित्रफीतही पोलिसांनी जप्त केली.

मृत लखबीर सिंग कामगार असून त्याचे वडील माजी सैनिक होते. कामानिमित्त लखबीर सिंग जास्त दिवस घऱाबाहेर असायचे असं त्यांची बहिण राज कौर यांनी सांगितलं आहे.

“सहा तारखेला लखबीरने माझ्याकडून ५० रुपये घेतले आणि आपण गावापासून दूर १५ किमी अतंरावर असणाऱअया चबल येथे जात असल्याचं सांगितलं,” अशी माहिती त्यांनी दिली. यानंतर त्यांच्यासोबत कुटुंबाचा संपर्क झाला नाही. शुक्रवारी कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली.

“त्यांना दिल्लीला कोण घेऊन गेलं हे तपासलं पाहिजे. आता आम्ही त्यांच्या मुलांची काळजी कशी घेणार?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे. लखबीर यांच्या मागे पत्नी आणि तीन मुलं आहेत. लखबीरच्या सासऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्जचं व्यसन असल्याने पत्नीने पाच सहा वर्षांपूर्वी त्याला सोडलं होतं. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर ती परत आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई वडिलांच्या मृत्यूनंतर लखबीर आपल्या बहिणीसोबत काकाच्या घऱी राहत होता. सहा वर्षांचा असताना त्यांनी त्याला दत्तक घेतलं होतं. तो दिल्लीत कसा पोहोचला याची माहिती आम्ही घेत आहोत.

संयुक्त किसान मोर्चाचे निवेदन

‘पंजाबमधील तरणतारण जिल्ह्य़ातील लखबीर सिंग याच्या हत्येची जबाबदारी घटनास्थळावरील निहंग गटाने घेतली आहे. मृत व्यक्ती तसेच निहंग गटाशी संयुक्त किसान मोर्चाचा काहीही संबंध नाही. कोणत्याही धार्मिक ग्रंथाचा अपमान करणे योग्य नाही हीच मोर्चाची भूमिका आहे. पण कोणालाही कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार नाही. धर्मग्रंथाचा अपमान आणि झालेली हत्या या दोघांमागील षड्यंत्राचा कसून तपास झाला पाहिजे व कटातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासंदर्भात होणाऱ्या कोणत्याही कायदेशीर चौकशीसाठी पोलीस व स्थानिक प्रशासनाला मोर्चा सहकार्य करेल,’ असे संयुक्त किसान मोर्चाने निवेदनात स्पष्ट केले.

घडले काय?

सिंघू सीमेवर पहाटे पाचच्या सुमारास शेतकरी आंदोलनस्थळानजीक लखबीर सिंग (३५) नामक व्यक्तीचा देह छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळला. गेल्या काही दिवसांपासून लखबीर आंदोलनस्थळी असलेल्या निहंग गटातील लोकांबरोबर राहात होता. त्याने शिखांचा धर्मग्रंथ ‘गुरू ग्रंथ साहिब’चा अनादर केल्याबद्दल निहंग शिखांनी त्याची हत्या केल्याचा संशय सोनिपत पोलिसांनी व्यक्त केला. या हिंसक घटनेनंतर संयुक्त किसान मोर्चातील नेत्यांनी तातडीने निवेदन प्रसिद्ध करून या घटनेपासून आंदोलनातील शेतकरी संघटनांना व त्यांच्या मोर्चाला वेगळे केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Singhu lynching lakhbir had rs 50 in pocket when he went to delhi sgy

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या