ग्रीक सरकारचे नेतृत्व करण्यासाठी सुरू असलेल्या चुरशीच्या शर्यतीच्या अखेरच्या टप्प्यात जहालवादी माजी पंतप्रधान अलेक्सिस सिप्रास यांनी विरोधी काँझव्‍‌र्हेटिव्हज उमेदवारावर निसटती आघाडी घेतली आहे. यामुळे ही निवडणूक अटीतटीची ठरत आहे.

मतदार सर्वेक्षणावरील बंदी संपण्याच्या काही तास आधी जाहीर झालेल्या काही निवडणूक अंदाजांमध्ये सिप्रास यांनी काँझव्‍‌र्हेटिव्ह पक्षाचे प्रमुख वँगेलिस मेमारकिस यांच्यावर ०.७ ते ३ पर्सेटेज पॉइंट्सची आघाडी घेतल्याचे भाकीत केले आहे. तथापि २००० सालच्या निवडणुकीत केवळ ७२ हजार मतांच्या फरकाने निकाल लागल्याची आठवण देऊन निवडणूकतज्ज्ञांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. या निवडणुकीत नऊ पक्ष संसदेत शिरकाव करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे, जो पक्ष जिंकेल त्याला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. कदाचित सिप्रास यांच्या सिरिझा पक्षालाही ज्यांच्यावर टीका केली त्यापैकी एखाद्या पक्षाची सोबत घ्यावी लागू शकते.