SIR Reunited Brothers After 35 Years in Haryana: देशभरातील विविध राज्यात मतदारयादीचे विशेष सखोल फेरतपासणी सुरू आहे. एसआयआरच्या प्रशासकीय कामामुळे हरियाणात दोन सख्ख्या भावांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेल्याची सुखद घटना समोर आली. तब्बल ३५ वर्षांपूर्वी ताटातूट झालेले दोन सख्खे भाऊ पुन्हा एकत्र आले. हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील मनोहरपूर येथील शासकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात घडलेल्या या भावनिक भेटीमुळे गावकऱ्यांचे डोळे पाणावले. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
पंजाबमध्ये राहणारे सीताराम हे आपला शाळा सोडल्याचा दाखला आणण्यासाठी जिंदच्या मनोहरपूर येथील शाळेत गेले होते. त्याच वेळी तिथे एसआयआर प्रक्रियेचे काम सुरू होते. प्रक्रियेचा भाग म्हणून बूथ लेव्हल ऑफिसरने (BLO) सीताराम यांच्याकडे त्यांच्या मूळ गावाची माहिती, वडिलांचे नाव आणि कुटुंबाचा तपशील विचारला. ही माहिती देत असताना सीताराम यांनी आपले बंधू दलबीर सिंह यांचा उल्लेख केला.
सीताराम यांनी दिलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी संबंधित बीएलओने दलबीर सिंह यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा निर्णय घेतला आणि तिथूनच या सुखद पुनर्मिलनाचा मार्ग मोकळा झाला.
एका फोन कॉलने संपवला ३५ वर्षांचा शोध
अधिकाऱ्याने सीताराम यांचे नाव घेताच पलीकडून बोलणाऱ्या दलबीर सिंह यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना ओळखले. “सीताराम माझा सख्खा भाऊ असून मी गेल्या ३५ वर्षांपासून त्याचा शोध घेत आहे,” असे दलबीर यांनी बीएलओला सांगितले. ही माहिती मिळताच दलबीर सिंह यांनी तातडीने शाळेच्या दिशेने धाव घेतली.
शाळेच्या आवारात ३५ वर्षांनंतर हे दोन बंधू समोरासमोर आले, तेव्हा दोघांनाही अश्रू अनावर झाले. एकमेकांना मिठी मारून रडणाऱ्या या भावांना पाहून शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारीही भावुक झाले होते. यानंतर दलबीर सिंह सीताराम यांना आपल्या दुचाकीवरून घरी घेऊन गेले.
प्रशासकीय प्रक्रियेचे कौतुक
मतदार पडताळणीदरम्यान अधिकाऱ्याने प्रसंगावधान राखून केलेला एक फोन कॉल या दोन भावांमधील दुवा ठरला. या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले अतिरिक्त साहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी डॉ. रमेश कुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, “केवळ शासकीय औपचारिकता वाटणाऱ्या या कामामुळे इतक्या वर्षांनी विभक्त झालेल्या कुटुंबाची पुन्हा भेट घडू शकते, हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.”
सीताराम पंजाबमध्ये स्थायिक
सीताराम दिव्यांग असून त्यांनी शाळेत असतानाच घर सोडले होते. ते पंजाबमध्ये गेले आणि तिथे त्यांनी एका खासगी शाळेत शिपाई म्हणून नोकरी स्वीकारली. एसआयआर प्रक्रियेसाठी ते शाळेतील नोंदणीचे प्रमाणपत्र आणण्यासाठी गेले होते.
