इशरत जहाँ चकमक पूर्वनियोजितच होती, असे सांगत माजी एसआयटी प्रमुख सतीश वर्मा यांनी आपले मौन सोडले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर. व्ही. एस. मणी यांनी मंगळवारी इशरत जहाँ चकमक प्रकरणात माजी एसआयटी प्रमुख सतीश वर्मा यांनी मला जबरदस्तीने दुसऱ्यांदा प्रतिज्ञापत्र सादर करण्यास भाग पाडले , असा आरोप केला होता. हे सर्व आरोप फेटाळताना सतिश वर्मा यांनी इशरत जहाँ चकमक पूर्वनियोजित असल्याचा दावा केला. चकमकीच्या एक दिवसआधी इशरत जहाँ आणि अन्य तिघांना आयबीकडून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आमच्या तपासात पुढे आली होती . इशरत जहाँ दहशतवादी असल्याच्या आरोप असणाऱ्या अन्य तिघांची साथीदार आहे, अशी कोणतीही माहिती गुप्तचर खात्याने आयबीला दिली नव्हती. इशरतबद्दल कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. मात्र, या लोकांनी त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन गोळ्या घातल्या, असा आरोप वर्मा यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राशी बोलताना केला.
इशरत जहाँ प्रकरणाच्या तपासासाठी गुजरात उच्च न्यायालयाने सतीश वर्मा यांची नेमणूक केली होती. इशरत मारली गेली ती २००४ मधील चकमक खरी होती असे प्रतिज्ञापत्र सुरुवातीला गुजरात पोलीस व गुप्तचर खात्याने दिले होते, पण ते यूपीए सरकारच्या सांगण्यावरून बदलण्यात आले. माजी गृहसचिव जी. के. पिल्लई यांनी अलीकडेच असे सांगितले की, ते प्रतिज्ञापत्र बदलण्याचा निर्णय राजकीय होता व त्यात तत्कालीन पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष व तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम सामील होते. त्यावेळी गृह खात्यात असलेले उप सचिव आर. व्ही. मणी यांचा छळ करून त्यांना प्रतिज्ञापत्र बदलण्यास भाग पाडण्यात आल्याचा दावा केला होता. चिदंबरम यांच्या सांगण्यावरूनच प्रतिज्ञापत्र बदलण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. या प्रतिज्ञापत्रावर मला सह्या करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी माझ्यावर जबरदस्ती करण्यात आली. माजी एसआयटी प्रमुख सतीश वर्मा यांनी माझा छळ करत सिगारेटचे चटके दिले. एक महिला सीबीआय अधिकारी माझा पाठलाग करत असे, अनेक गौप्यस्फोट मणी यांनी मुलाखतीत केले होते.