उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये चार शेतकरी आणि चार भाजपा कार्यकर्त्यांचा समावेश होता. शेतकऱ्यांना चिरडल्याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक करण्यात आली आहे. तर, भाजपा कार्यकर्त्यांच्या मृत्यूप्रकरणी उत्तर प्रदेश एसआयटीने संशयित मारेकऱ्यांचे फोटो जारी केले आहेत.

या फोटोमध्ये काही लोक हातात काठ्या आणि काळे झेंडे घेऊन जळत्या वाहनांजवळ उभे आहेत. भाजपा कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला हा जाणीवपूर्वक करण्यात आला होता की शेतकऱ्यांना चिरडल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तसेच या फोटोतील लोकांबद्दल माहिती देणाऱ्यांना बक्षील म्हणून रोख रक्कम देण्यात येईल, असंही जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, ही रक्कम किती असेल, याबद्दल सांगण्यात आलेलं नाही.

दरम्यान, एसआयटीने फोटो जारी केल्यानंतर या प्रकरणी टीका होत आहे. मानवाधिकार कार्यकर्ते त्रिलोचन सिंग गांधी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, की “शेतकऱ्यांची नावे माहित नसताना, त्यांच्याविरोधात पुरावे नसताना त्यांचे फोटो सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करणे चुकीचे आहे. यामुळे या शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हे लोक हिंसाचारानंतर मदत कार्य करणारी देखील असू शकतात.” तर, लखनऊचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एसएन साबत म्हणाले की, “ही कायदेशीर प्रक्रिया आहे. यामुळे कोणत्या मानवाधिकाराचे उल्लंघन होत नाही. तसेच फोटो प्रसिद्ध केल्यामुळे या लोकांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होणार नाही.”