पीटीआय, नवी दिल्ली : गुजरातेत २००२ मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतरांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) दिलेल्या निर्दोषत्वाला (क्लिनचीट) आव्हान देणारी माजी काँग्रेस खासदार एहसान जाफरी यांच्या विधवा पत्नी झाकिया यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली आणि एसआयटीचा अहवाल कायम ठेवला.

‘‘गोध्रा घटनेनंतरची हिंसा ही उच्चस्तरावर रचलेल्या कटानुसार घडवलेली ‘पूर्वनियोजित घटना’ होती’’ या आरोपाच्या पुष्टय़र्थ कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे झाकिया यांची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मुस्लिमांविरुद्ध मोठय़ा प्रमाणात हिंसाचार घडवून आणण्यासाठी उच्च पातळीवर मोठा गुन्हेगारी कट शिजवण्यात आल्याच्या आरोपाला तपासादरम्यान जमवलेल्या पुराव्यांतून पुष्टी मिळत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

गोध्रा घटनेनंतरचा हिंसाचार पूर्वनियोजित होता, राज्यातील सर्वोच्च पातळीवर हा गुन्हेगारी कट रचला गेला, या अपीलकर्त्यांच्या आरोपाच्या समर्थनार्थ ठोस पुरावे सादर केले नसल्याचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने आपल्या ४५२  पृष्ठांच्या निकालात म्हटले आहे.

गोध्रा येथे २७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला लावलेल्या आगीत ५९ लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी, २८ फेब्रुवारी २००२ रोजी अहमदाबाद येथील गुलबर्ग सोसायटी येथे झालेल्या दंगलीत माजी खासदार इशान जाफरी यांच्यासह ६८ जणांचा बळी घेतला गेला होता. या प्रकरणात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना विशेष तपास पथकाने निर्दोषत्व बहाल केले होते. त्या विरोधात जाफरी यांच्या विधवा पत्नी झाकिया यांनी आधी गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

न्यायालय काय म्हणाले?

मुस्लिमांविरुद्ध मोठय़ा प्रमाणात हिंसाचार घडवून आणण्यासाठी राज्याच्या उच्च पातळीवर मोठा गुन्हेगारी कट शिजवण्यात आल्याच्या आरोपाची पुष्टी करणारे कोणतेही ठोस पुरावे सादर केलेले नाहीत. 

प्रकरण काय?

  • गोध्रा येथे २७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला लावलेल्या आगीत ५९ लोकांचा मृत्यू.
  • गोध्रा घटनेच्या दुसऱ्याच दिवशी संपूर्ण गुजरातमध्ये दंगलींचा भडका.
  • अहमदाबाद येथील दंगलीत काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह ६८ जणांचा बळी.
  • या प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना विशेष तपास पथकाकडून निर्दोषत्व.
  • विशेष तपास पथकाच्या अहवालाला जाफरी यांच्या विधवा पत्नीचे आव्हान.