Who was CPI(M) General Secretary Sitaram Yechury: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांची प्रकृती खालावल्यामुळे मंगळवार, दि. १० सप्टेंबर रोजी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (दि. १२ सप्टेंबर) अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. ताप, अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर त्यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच ७२ वर्षीय येचुरी यांचे निधन झाले. २०१५ साली ज्येष्ठ नेते प्रकाश करात यांच्यानंतर सीताराम येचुरी यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर २०१८ आणि २०२२ साली त्यांना दोन वेळा या पदावर राहण्याची संधी मिळाली. डाव्या पक्षातील निर्णय प्रक्रियेत महासचिव हे सर्वोच्च पद मानले जाते.
कोण होते सीताराम येचुरी?
सीताराम येचुरी हे भारतातील प्रख्यात मार्क्सवादी नेते असून, त्यांची राजकीय जडण घडण डाव्या विचारांच्या चळवळीत झाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच CPI(M) चा एक सामान्य कार्यकर्ता ते महासचिव या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा राजकीय प्रवास आहे. डाव्या विचारसरणीशी असलेली एकनिष्ठता, त्या अनुषंगाने घेतलेल्या भूमिका आणि त्या भूमिकांसाठी वेळोवेळी राजकीय किंमत मोजण्याची तयारी.. या गुणांमुळे ते भारतीय डाव्या राजकारणातील एक महत्त्वाचा आवाज म्हणून समोर आले.
सीताराम येचुरी यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये लोकसत्ता दैनिकाला दिलेली मुलाखत पाहा –
सुरुवातीचे जीवन आणि राजकीय प्रवेश
सीताराम येचुरी यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण हैदराबाद येथे झाले आणि त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रातील पदवी प्राप्त केली. पुढे, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) त्यांनी अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतले, जिथे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.
हे वाचा >> ‘राजा-प्रजा’ प्रथेकडे आपला उलटा प्रवास! – सीताराम येचुरी
१९७० च्या दशकात, विद्यार्थीदशेतच येचुरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या ‘स्टूडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ (SFI) या विद्यार्थी संघटनेत सामील झाले. कालांतराने ते SFI चे प्रमुख नेते बनले आणि या संघटनेचे अध्यक्षही झाले. १९८४ साली येचुरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य बनले. १९९२ साली त्यांची पक्षाच्या पॉलिटब्युरोमध्ये नियुक्ती झाली. पक्षाचे मुखपत्र असलेल्या “पीपल्स डेमोक्रसी”चे अनेक वर्ष संपादकपदही त्यांनी भूषविले.
राजकीय कारकीर्द कशी होती?
सीताराम येचुरी यांनी १९७५ च्या आणीबाणीच्या काळात सरकारविरोधी आंदोलने केली आणि यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यानंतर ते CPI(M) चे एक महत्त्वाचे नेते बनले. २००५ मध्ये त्यांनी राजकीय कार्यकारिणी समितीमध्ये प्रवेश केला आणि २०१५ मध्ये पहिल्यांदा पक्षाचे सरचिटणीस झाले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाने देशातील विविध आंदोलने आणि कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष केला आहे. त्यानंतर २०१८ आणि २०२२ साली त्यांची पुन्हा याच पदासाठी फेरनियुक्ती करण्यात आली होती.
राज्यसभेचे खासदार ते यूपीए सरकारमधील महत्त्वाचे नेते
सीताराम येचुरी यांनी २००५ ते २०१७ दरम्यान राज्यसभेत पक्षाचे प्रतिनिधित्व केले. संसदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर, विशेषत: कामगार, गरीब आणि मध्यमवर्गीयांचे अधिकार आणि समस्यांवर आवाज उचलला. त्यांची संसदेतील अनेक भाषणे गाजली. येचुरी कोणती भूमिका मांडतात याकडे फक्त डाव्या चळवळीतीलच नाही तर इतर पक्षाच्या नेत्यांना आणि राजकीय अभ्यासकांनाही कुतूहल असे. श्रमिक, कामगारांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी संसद आणि रस्त्यावरची लढाई नेहमीच लढली. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर कायम भूमिका घेतली आणि संघ परिवाराच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला नेहमी विरोध केला.
भाजपा आणि संघाचे कडवे टीकाकार
भाजपा आणि संघावर काँग्रेसपेक्षाही अधिक कडवी टीका सीताराम येचुरी यांनी केलेली आहे. लोकसत्ताच्या लोकसंवाद या कार्यक्रमात राम मंदिरावर बोलताना ते म्हणाले होते, “महात्मा गांधी किंवा राम मनोहर लोहिया यांनी रामाचा उल्लेख केला असला तरी तो राजकारणासाठी नव्हता. त्यामागे रामराज्य किंवा रामाची पूजा करणे हा उद्देश होता. भाजपकडून रामाचा नेहमी राजकीय फायद्यासाठीच वापर केला गेला. यामुळेच भाजपची मंडळी ‘जय श्रीराम’ असाच उल्लेख करतात. ते ‘जय सियाराम’ असे म्हणत नाहीत. भाजप किंवा रा. स्व. संघाचे हिंदूत्व हे नेहमीच उच्चवर्णीयांचे किंवा ब्राह्मणवादी राहिले आहे. त्यांच्या हिंदूत्वाचा सारा ढाचा हा मनुस्मृतीवर आधारित आहे. समाजाची रचना कशी असावी याचे स्वरूपही संघ परिवाराने मनुस्मृतीनुसारच केले आहे. महिलांना कशी वागणूक दिली जाते हे त्याचेच उदाहरण आहे. खाप पंचायतींना अजूनही प्रोत्साहन दिले जाते. मनुस्मृतीला एक प्रकारे बळ देण्याचे कामच या सरकारने केले आहे. उच्चवर्णीयांचेच हित जपले जाते हेसुद्धा अनुभवास आले आहे.”