नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील स्थिती टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर आणण्यामध्ये भारत आणि चीन यशस्वी होतील कारण प्रादेशिक शांततेसाठी ही बाब आवश्यक असल्याची दोन्ही देशांना जाणीव आहे, असे संरक्षण दलांचे प्रमुख जन. बिपीन रावत यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

तथापि, भारताने कोणत्याही दु:साहसाचा मुकाबला करण्यासाठी पूर्वीप्रमाणे सुसज्ज राहिले पाहिजे, असेही रावत म्हणाले. विचारवंतांच्या एका परिषदेत ते बोलत होते. भारताने सज्ज राहिले पाहिजे, कोणत्याही आगळिकीचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे, यापूर्वी आपण जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे तसेच भविष्यातही सज्ज राहिले पाहिजे इतकेच आपल्याला म्हणावयाचे आहे, असे रावत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

पूर्व लडाखमधील तिढा सोडविण्यासाठी दोन्ही देशांचे राजकीय, राजनैतिक आणि लष्करी स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.  टप्प्याटप्प्याने आपण त्यामध्ये यशस्वी होऊ, प्रादेशिक शांततेसाठी ही बाब आवश्यक आहे याची दोन्ही देशांना जाणीव आहे, असेही ते म्हणाले.