ममता बॅनर्जी यांची लस पुरवठ्यातील तफावतीबाबत टीका, पंतप्रधानांना पत्र

पश्चिम बंगालच्या लसपुरवठ्यात वाढ न केल्यास राज्यातील करोनाची स्थिती गंभीर होऊ शकते, अशी भीती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त करत लस वाटपात होणाऱ्या तफावतीसंदर्भात आवाज उठवला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी पत्र लिहून लसपुरवठा वाढविण्याची मागणी केली.

राज्याची लोकसंख्या अधिक असूनही त्या तुलनेत होणारा लसपुरवठा कमी असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्व पात्र नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्याला १४ कोटी मात्रांची आवश्यकता आहे. दररोज ११ लाख मात्रा देण्याची क्षमता असूनही केवळ लसपुरवढा कमी होत असल्याने सध्या राज्यात दिवसाला चार लाख मात्रा देण्यात येत आहेत.  राज्याची लोकसंख्या अधिक असून आणि शहरीकरणाचा दरही जास्त असताना राज्याला अतिशय कमी प्रमाणात लसपुरवठा होतो, असे पत्रात बॅनर्जी यांनी नमूद केले आहे. तसेच याआधीही वारंवार यासंदर्भात पत्रव्यवहार केला असूनही पंतप्रधानांनी त्याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप ममतांनी केला.

केंद्र सरकारकडून काही राज्यांना मोठ्या प्रमाणात लस वाटप होते, हे सांगण्यात मला खेद वाटतो. एखाद्या राज्याला अधिक लसपुरवठा होत असेल तर माझी काहीच हरकत नाही. मात्र पश्चिम बंगालला लसपुरवठ्याबाबत दुर्लक्षित केले जात असल्यास मी शांतपणे पाहू शकत नसल्याचे ममता म्हणाल्या. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत एकूण ३.०९ कोटी जणांचे लसीकरण झाले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

२.६९ कोटी लसमात्रा शिल्लक

नवी दिल्ली : शिल्लक राहिलेल्या आणि वापरल्या न गेलेल्या अशा करोना प्रतिबंधक लशींच्या एकूण २.६९ कोटींहून अधिक मात्रा राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे शिल्लक आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सर्व स्रोतांद्वारे लशींच्या ५१.०१ कोटी मात्रा पुरवण्यात आल्या असून, आणखी ७,५३,६२० मात्रा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या बेतात आहेत. यापैकी, वाया गेलेल्या लशी जमेस धरता ४८,६०,१५,२३२ इतक्या लशींचा वापर झाला आहे, असे मंत्रालयाने सांगितले. करोनाच्या सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा २१ जूनपासून सुरू झाला होता.