केंद्र सरकारने प्रवासी कारसाठी सहा-एअरबॅग अनिवार्य नियमाची अंमलबजावणी पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज याबाबत घोषणा केली.

जागतिक पुरवठा साखळीतील समस्यांमुळे सहा एरअर बॅग निर्देश पुढे ढकलण्यात आला असल्याचे सांगण्यात आले असून, त्यामुळे हा नियम आता १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू होणार आहे. यापूर्वी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने आठ आसनी वाहनांमध्ये सहा एअरबॅग्ज बसवणे बंधनकारक केले होते. हा आदेश १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होणार होता.

“वाहन उद्योगाला भेडसावणाऱ्या जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी आणि त्याचा आर्थिक परिस्थितीवर होणारा व्यापक परिणाम लक्षात घेऊन, ०१ ऑक्टोबर २०२३ पासून प्रवासी कारमध्ये किमान सहा एअरबॅग्ज अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” असं ट्वीट करून नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे.

सहा एअर बॅगचा निर्णय घेताना गडकरी म्हणाले होती की, आम्ही कारमध्ये किमान सहा एअर बॅग उपलब्ध करणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लोकांचे जीव वाचवू इच्छितो, यासाठी वाहन उद्योगासह सर्व पक्षांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.