केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन निर्मात्यांना पुढच्या एका वर्षात फ्लेक्स इंधन वाहने आणण्याचे आवाहन केले आहे. ही वाहने पुर्णपणे इथेनॉल किंवा गॅसोलाईनवर चालू शकतील, अशी असावी असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच वाहनचालकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारच्या सर्व प्रकारच्या मॉडेल्समध्ये किमान सहा एअरबॅग्स देण्यात याव्या, अशी मागणीही त्यांनी केली. सोसायटी ऑफ इंडिया ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या सीईओंच्या शिष्टमंडळाशी मंगळवारी त्यांनी घेतलेल्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा केली. याबद्दल त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

सध्या भारतात १० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची आणि टॉप-स्पेक व्हेरिएंट असलेली बहुतांश वाहने सहा एअरबॅग्स देतात. पण बजेटनुसार मोठ्या प्रमाणात वाहने केवळ दोन एअरबॅग देतात. तसेच बहुतेक मॉडेल्स ज्यामध्ये सध्याच्या काळात सर्वाधिक परवडणाऱ्या कारचा समावेश आहे, त्याही केवळ दोन एअरबॅग्स देतात. त्यापूर्वी काही वाहने अगदी एअरबॅग्सशिवाय दिली जात होती. भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व कारमध्ये ३१ ऑगस्ट, २०२१ पासून कमीतकमी दोन एअरबॅग असणे आवश्यक आहे, असा नियम करण्यात आला आहे.

काही आठवड्यांपूर्वी नितीन गडकरी यांनी “हायड्रोजन आणि गॅस बेस्ड मोबिलीटी” परिषदेला संबोधित केलं होतं. यावेळी सरकार संभाव्य वाहतूक इंधन म्हणून ग्रीन हायड्रोजनबद्दल शक्यता शोधत आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकार ज्या सवलती देत आहेत त्या ग्रीन हायड्रोजनलाही देऊ शकतात. सोबतच भारतातील सौर, पवन, जल आणि कचरा क्षमतेमुळे देश ग्रीन हायड्रोजन उत्पादनात जगाचे नेतृत्व करू शकतो, असेही असे नितीन गडकरी म्हणाले होते.