नवी दिल्ली : धूर, धुके आणि मळभ या तिन्ही घटकांनी दिल्लीकरांना वेढले असून फुफ्फुसे निकामी करणाऱ्या ‘पीएम २.५’ या अत्यंत घातक धूलिकणांचे प्रमाण तब्बल ४०० मायक्रोग्रॅम्स प्रति घनमीटरवर पोहोचले आहे. ते निर्धारित मानकापेक्षा सहापट जास्त आहे.

   दोन-तीन दिवसांपासून राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील किमान तापमान सुमारे १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने जमिनीलगत वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे हवेची गुणवत्ता आणखी खराब झालेली आहे. प्रदूषित हवेमुळे आकाशात तांबडे पट्टे दिसत असून कोंदट वातावरणामुळे श्वास कोंडू लागला आहे.

  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दररोज ट्वीट करून राजधानीतील हवेची गुणवत्ता किती तीव्रतेने खालावत गेली याची आकडेवारी प्रसिद्ध करत आहेत. गुरुवारी (११ नोव्हेंबर) हवेतील प्रदूषणाचे प्रमाण (एक्यूआय) ४११, ‘पीएम-१०’चे प्रमाण ४५२ तर, ‘पीएम २.५’चे प्रमाण २७३ इतके  होते. बुधवारी (१० नोव्हेंबर) हेच प्रमाण अनुक्रमे ३७२, ३८३ आणि २२१ इतके होते. शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) हे प्रमाण ४७१, ५९३ आणि ३९९ इतके प्रचंड वाढले.

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यांच्या पूर्वार्धात दिल्लीतील हवेतील प्रदूषणाचे प्रमाण कमालीचे वाढत जाते. ‘पीएम २.५’ या धुलीकरणाचे प्रमाण जास्तीत जास्त ६० मायक्रोग्रॅम्स प्रति घनमीटर असले पाहिजे, पण सध्या हे प्रमाण सहापटीने जास्त आहे.

करोनानंतर खासगी तसेच सार्वजनिक वाहतूक पूर्ववत झाली असल्याने दिल्लीतील प्रदूषणाच्या प्रमाणात दोन महिन्यांमध्ये वाढ झालेली आहे. दिल्लीमध्ये सर्वाधिक प्रदूषण वाहनांमुळे होत असून त्यात हिवाळ्यात पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या शेजारील राज्यांमधील शेतातील खुंट जाळणीमुळे प्रदूषणात भर पडते. गेल्या कोही दिवसांपासून प्रामुख्याने पंजाबामध्ये खुंट जाळणी सुरू झाली असून सुमारे ४ हजार शेतांमध्ये खुंट जाळण्यात आल्याने दिल्लीच्या प्रदूषणात ३५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे दिल्ली प्रदषण नियंत्रण मंडळाचे म्हणणे आहे. ५० ‘’एक्यूआय’’पर्यंत हवेची गुणवत्ता उत्तम मानली जाते. ५१-१०० हे प्रमाण समाधानकारक, १०१-२०० मध्यम, २०१-३०० वाईट, ३०१-४०० खराब, ४०१-५०० अत्यंत खराब असे गुणवत्तेचे निकष आहेत. दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झालेली आहे. गेल्या वर्षीही ५ नोव्हेंबर रोजी खुंट जाळणीमुळे दिल्लीतील प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक ४२ टक्क्यांनी वाढले होते.

दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी शुœवारी प्रदूषण नियंत्रण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली. दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारने उघड्यावर कचरा जाळण्यावर बंदी घातली आहे. रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी पार्किंग तिकिटांचे दर वाढवणे, मेट्रो व बसगाड्यांची संख्या वाढवणे, अतिप्रदूषित भागांमध्ये धूलिकण खाली बसावेत यासाठी पाण्याचे फवारे मारणे आदी उपाय केले जात आहेत. दिल्ली राज्यात खुंट जाळण्यापेक्षा जैवविघटके मिश्रण फवारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरवर्षी पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांनाही हे मिश्रण फवारण्यासाठी प्रवृत्त केले जात असले तरी अजून अपेक्षित यश आलेले नाही.