पाकिस्तानी सैन्याने शनिवारी केलेल्या तोफगोळे आणि ड्रोन हल्ल्यात सहा जण ठार झाले तर बीएसएफचे आठ जवान जखमी झाले. या हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रांचे अवशेष आढळल्यामुळे रहिवासी परिसरात दहशत पसरली आहे.
दरम्यान, पंजाबमधील अमृतसर, जालंधर, पठाणकोट आणि दाबली येथे क्षेपणास्त्रांचे अवशेष आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शनिवारी सकाळी पूंछमधील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये चौकीजवळ पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या हल्ल्यात हिमाचल प्रदेशचे रहिवासी सुभेदार मेजर पवन कुमार यांना आपला जीव गमवावा लागला.
राजौरी शहरातील औद्याोगिक क्षेत्राजवळ पाकिस्तानी गोळीबारात आयशा नूर (२) आणि मोहम्मद शोहिब (३५) यांचा मृत्यू झाला आणि इतर तीन जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पूंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमधील कांगडा-गल्हुट्टा गावात घरावर मोर्टारचा गोळा पडल्याने ५५ वर्षीय रशिदा बी नावाच्या महिलेचाही मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत, आरएस पुरा येथे सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात बिडीपूर जट्टा गावातील रहिवासी अशोक कुमार ऊर्फ शौकी यांचा मृत्यू झाला. पूंछमध्ये झालेल्या जोरदार गोळीबारात आणखी तीन जण जखमी झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये एका स्थानिक पत्रकाराला दुखापत झाली. जम्मूच्या बाहेरील बंतलाब येथील खेरी केरन गावात पाकिस्तानी गोळीबारात झाकीर हुसेन (४५) ठार झाले तर एका मुलीसह दोघे जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू शहरातील रेहारी आणि रूप नगरसह जम्मूमधील काही निवासी भागात तोफखाना गोळीबार आणि संशयित ड्रोन हल्ल्यात चार जण जखमी झाले.
दहशतवादी तळ उद्ध्वस्त; बीएसएफचे जवान जखमी
दिल्ली/जम्मू : जम्मूमधील अखनूर येथून जवळ पाकिस्तानी हद्दीमधील दहशतवाद्यांचा तळ सीमा सुरक्षा दलांनी (बीएसएफ) शनिवारी उद्ध्वस्त केला. पाकिस्तानच्या सियालकोट जिल्ह्यातून लूनी येथील या तळावरून भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी होत असल्याची माहिती बीएसएफच्या प्रवक्त्यांनी दिली. शुक्रवारी रात्री ९ वाजता पाकिस्तानमधून बीएसएफच्या चौकीवर विनाकारण हल्ला झाल्यानंतर शनिवारी ही कारवाई झाली. दरम्यान, आर. एस. पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरून केलेल्या हल्ल्यात बीएसएफचे आठ जवान जखमी झाले. सर्वांना लष्कराच्या उपचार केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
जम्मू काश्मिरातील सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू
शनिवारी सकाळी जम्मूमध्ये पाकिस्तानने केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात आणि ड्रोन हल्ल्यात जम्मू आणि काश्मीरमधील एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. राजौरी शहरातील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या तोफखान्याच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापा आणि त्यांचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. थापा यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जम्मू आणि काश्मीर प्रशासकीय सेवा (जेकेएएस) अधिकारी राज कुमार थापा यांच्या निधनानंतर केंद्रशासित प्रदेशात शोककळा पसरली. एमबीबीएस पदवीधर असलेले थापा २००१ मध्ये जम्मू आणि काश्मीर प्रशासकीय सेवेत (जेकेएएस) सामील झाले होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये राजौरी येथे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त म्हणून थापा यांची नियुक्ती झाली होती.