लुंबिनी (नेपाळ) : भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थळ असलेल्या लुंबिनी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्याशी सोमवारी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांतील सहकार्य अधिक दृढ व्हावे व नवनवीन क्षेत्रांत बहुआयामी भागीदारी वाढावी, या मुद्दय़ांवर दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. या चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांशी संबंधित सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

नेपाळच्या पंतप्रधानांच्या निमंत्रणावरून मोदी नेपाळच्या एकदिवसीय दौऱ्यावर गेले होते. २०१४ पासूनचा त्यांचा हा पाचवा दौरा आहे. लुंबिनीला मात्र त्यांनी प्रथमच भेट दिली. बुद्धपौर्णिमेनिमित्त त्यांनी पवित्र बुद्ध जन्मभूमी लुंबिनी येथे जाण्याचे औचित्य साधले. पंतप्रधान देऊबा यांच्याशी चर्चेआधी मोदींनी बुद्धांचे जन्मस्थळ असलेल्या मायादेवी मंदिरात दर्शन व प्रार्थना केली. या मंदिरातील स्मृतिशिलेस वंदन केले. बुद्धांचा जन्म जेथे झाला, त्या स्थळी ही शिळा उभारलेली आहे. या वेळी बौद्ध परंपरेतील पूजेतही दोन्ही नेत्यांनी सहभाग घेतला.

मोदींनी २०१४ मध्ये लुंबिनीसाठी भेट दिलेल्या बोधगया येथील बोधिवृक्षाच्या रोपटय़ास दोन्ही नेत्यांनी जलसिंचन केले. त्यानंतर मंदिराच्या प्रतिक्रिया नोंदवहीत प्रतिक्रिया नोंदवली. लुंबिनी येथील बौद्ध मठ क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या भारतीय बौद्ध संस्कृती आणि परंपरेच्या आंतरराष्ट्रीय केंद्राची पायाभरणी दोन्ही नेत्यांनी केली. लुंबिनी विकास विश्वस्त संस्थेतर्फे आयोजित बुद्धजयंती सोहळय़ात उपस्थितांना मोदींनी विशेष संबोधनही केले.

‘नेपाळसह भारताचे संबंध अतुलनीय’

मोदी आणि त्यांच्या शिष्टमंडळासाठी देऊबा यांनी भोजनसोहळा आयोजित केला होता. नेपाळ दौऱ्यापूर्वी मोदींनी सांगितले, की दोन्ही देशांत पूर्वापार चालत आलेले संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा दौरा आहे. जलविद्युतनिर्मिती, दळणवळणासह अनेक क्षेत्रांत परस्परसंबंध अधिक घट्ट करण्यावर भर राहील. नेपाळसह भारताचे संबंध पुरातन व अतुलनीय आहेत. दोन्ही देशांमधील संबंध हे दोन्ही संस्कृती आणि नागरिकांतील संबंधांच्या भक्कम पायावर उभे आहेत.