समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज (शनिवार) बसपा आणि भाजपाला धक्का दिला आहे. लखनऊमध्ये समाजवादी पार्टीच्या मुख्यालयामध्ये पोहचलेल्या बसपाच्या सहा बंडखोर आमदरांनी आणि भाजपाच्या एका आमदाराने समाजवादी पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. सर्व बंडखोर आमदरांना अखिलेश यादव यांनी सदस्यता दिली. बसपाचे सहा बंडखोर आमदारांमध्ये सुषमा पटेल, हरगोविंद भार्गव, अस्लम चौधरी, अस्लम राइनी, हाकीम लाल बिंद आणि मुज्ताब सिद्दीकी यांचा समावेश आहे. तर, भाजपा बंडखोर आमदार राकेश राठौर हे समाजवादी पार्टीमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना अखिलेश यादव यांनी भाजपावर जोरदार टीका केली. भाजपाच्या एका आमदाराने सपा मध्ये प्रवेश केल्यानंतर अखिलेश यादव यांनी म्हटले की, मुख्यमंत्री भाजपाचा नारा बदलतील. ‘माझा परिवार भाजपा परिवार’ च्या जागी ‘ मेरा परिवार भागता परिवार’ ठेवतील. याचबरोबर, अखिलेश म्हणाले की, भाजपाने आपल्या वचननाम्यातील आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. समाजवादीचे मत आहे की, जी काँग्रेस आहे तीच भाजपा आहे आणि जी भाजपा आहे तीच काँग्रेस आहे.