Bulandshahr Gangrape Encounter: उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे लाजिरवाणी आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. एका सहा वर्षांच्या चिमुकलीवर दोन नराधमांनी बलात्कार करून गच्चीवरून खाली फेकले. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. आपलं कृत्य बाहेर येऊ नये, म्हणून नराधमांना चिमुकलीचा जीव घेतला. ही घटना २ जानेवारीच्या रात्री घडली. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अल्पवयीन मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
चिमुकलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ७० (२) आणि १०३ (१) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ५(एम) आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रारीत त्यांनी म्हटले की, राजू आणि विरू कश्यप नावाचे दोन तरूण याच इमारतीत भाड्याने राहत होते.
सहा वर्षांची चिमुकली गच्चीवर खेळत होती. काही वेळाने ती इमारतीच्या मागे शेतात जखमी अवस्थेत पडलेली आढळली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी तीन पथके तैनात करून आरोपींचा शोध सुरू केला. दोन्ही आरोपी जवळच असलेल्या एका निर्माणाधीन कॉलनीत लपले असल्याचे समजले.
यानंतर सिंकदराबाद पोलिसांनी सदर परिसराला घेराव घातला. यानंतर आरोपींनी पळून जाण्यासाठी पोलिसांवरच गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. ज्यामध्ये राजू आणि विरू कश्यपच्या पायाला गोळी लागली. पोलिसांनी त्यांना जखमी अवस्थेत अटक करून रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्या केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
