लग्नासाठी निघालेल्या वरातीवरच कोसळली वीज, १६ जणांचा मृत्यू; नवरदेव थोडक्यात बचावला

आश्रयाला थांबलेल्या वऱ्हाडावर वीज कोसळली आणि तब्बल १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Lightning strike
संग्रहित छायाचित्र

अगदी आनंदात लग्नासाठी निघालेली वरात लग्नस्थळी पोहोचलीच नाही. जोरदार पाऊस पडत असल्याने आश्रयाला थांबलेल्या वऱ्हाडावर वीज कोसळली आणि तब्बल १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुखःद घटनेत नवरदेवही जखमी झाला आहे. ही घटना बांगलादेशच्या चपैनवाबगंज जिल्ह्यात घडली.

नदीकाठच्या एका गावात लग्न होणार होते, त्यामुळे वरातीतील लोक बोटीने निघाले होते. परंतु, पावसाचा जोर वाढल्याने आणि विजा कडाडू लागल्याने ते आश्रय घेण्यासाठी शिबगंज नावाच्या गावात उतरले होते. मात्र, ते ज्याठिकाणी थांबले होते तिथेच वीज कोसळली आणि तब्बल १६ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या आठवड्यात अशाच एका घटनेत बांगलादेशमध्ये २० जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ६ निर्वासित रोहिंग्यादेखील होते. दक्षिण आशियाई देशांमध्ये दरवर्षी वीज कोसळून शेकडो लोकांचा मृत्यू होतो. आकडेवारीनुसार, २०१६मध्ये वीज कोसळून २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. एकट्या मे महिन्यात तब्बल ८२ जणांनी जीव गमावले होते.

सेल्फी घेताना वीज पडून ११ जणांनी गमावला जीव…

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केवळ उत्तर प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यात ६० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. यावेळी जयपूरच्या आंबेर किल्ल्यावर सेल्फी घेणाऱ्या काही लोकांवर वीज पडून ११ जणांचा मृत्यू झाला होता. मृत सर्वजण फिरायला किल्ल्यावर आले होते. सर्वजण सेल्फी घेताना अचानक फोनवर वीज कोसळली आणि तब्बल ११ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेनंतर घाबरलेले अनेक जण सैरावैरा पळाले होते. त्यामध्ये काही जण जखमी झाले होते. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sixteen killed due to lightning strike on wedding party in bangladesh hrc