सिया गोयल या तरुणीने तिचा होणारा नवरा केतन अग्रवाल याला १८ जून रोजी लोहगडावरुन ढकलून दिलं आणि त्याची हत्या केली. या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू आहे हे भासवलं गेलं. पण नंतर ही हत्या असल्याची बाब समोर आली. सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन या दोघांवर या हत्येचा आरोप आहे. या प्रकरणाचे विविध पैलूही समोर आले, दरम्यान बंगळुरुतल्या एका व्यावसायिकाने सिया प्रकरणाची धास्ती घेतल्याचं म्हटलं आहे.एवढंच नाही तर आपल्याला पत्नीकडून आणि तिच्या प्रियकराकडून धमक्या येत असल्याचा आरोपही त्याने केला आहे.
बंगळुरुतल्या व्यावसायिकाने काय आरोप केलेत?
बंगळुरुतल्या एका व्यावसायिकाने हा आरोप केला आहे की त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनी एका माणसाला मला धमक्या देण्याची सुपारी दिली आहे. मी घटस्फोटाचा अर्ज मागे घ्यावा यासाठी माझ्यावर दबाव टाकला जातो आहे. मी घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर माझ्या अर्जानंतर माझ्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही तक्रार मागे घेण्यासाठी मला धमक्या दिल्या जात आहेत.
पत्नीकडून आणि तिच्या प्रियकराकडून जिवाला धोका
तक्रारदार हा बंगळुरुतला ३२ वर्षीय व्यावसायिक आहे. त्याने कोर्टात हे सांगितलं आहे आपल्याला पत्नीकडून आणि तिच्या प्रियकराकडून धोका आहे. कारण हे दोघंही मला ठार करु शकतात. पुण्यातल्या लोहगडावरुन सिया गोयलने जसं केतन अग्रवालला ढकलून दिलं आणि त्यासाठी चेतन चौधरीची म्हणजेच तिच्या प्रियकराची मदत घेतली त्याचप्रमाणे माझा काटा हे दोघं मिळून काढू शकतात अशी भीती मला वाटते आहे असं सदर व्यावसायिकाने कोर्टाला सांगितलं. डेकन्न हेराल्डने हे वृत्त दिलं आहे.
१० एप्रिलला काय घडलं?
या व्यावसायिकाने सांगितलं की १० एप्रिलला मी कारने घरी जात होतो. माझ्यासह माझी पाच वर्षांची मुलगी होती. त्यावेळी एका अज्ञात बायकरने माझी कार रोखली. तो माझ्या कारच्या खिडकीवर टकटक करत होता. त्याने मला धमक्या दिल्या. त्या माणसाला माझ्या पत्नीच्या प्रियकराने पाठवलं होतं. त्या बायकरनेही मला धमकी दिली की पोलिसांची तक्रार मागे घे नाहीतर तुझ्यासह चांगलं होणार नाही, असंही या व्यावसायिकाने सांगितलं. या व्यावसायिकाचं लग्न झालं आहे. २९ ऑक्टोबर २०२० पासून हा व्यावसायिक विवाहित आहे. या दोघांना पाच वर्षांची एक मुलगी आहे. पण या दोघांची डिव्होर्स केस सुरु आहे.
