मॉडेल आणि अभिनेत्री त्विशा शर्माच्या मृत्यूचं प्रकरण मे महिन्यात चांगलंच चर्चेत आला होतं. या प्रकरणात त्विशा शर्माच्या मृतदेहाचं जे शवविच्छेदन करण्यात आलं होतं त्यावेळी जिन्मॅस्टिक बेल्ट शवविच्छेदन करणाऱ्या टीमला देण्यात आलेला नव्हता. आता हाच जिन्मॅस्टिक बेल्ट एक मोठा पुरावा ठरु शकतो अशी शक्यता आहे. कारण एम्स रुग्णालयाने जो अहवाल दिला आहे त्यानुसार या बेल्टवर त्विशाच्या त्वचेचे काही भाग आढळले आहेत. दिल्ली एम्स रुग्णालयाने हा अहवाल सीबीआयकडे सोपवला आहे. यातले तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

त्विशाच्या मृत्यू प्रकरणात बेल्ट ठरणार मोठा पुरावा?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिन्मॅस्टिक बेल्टवर त्विशाच्या त्वचेचे काही अवशेष आढळले आहेत. त्विशाने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली? हे अद्याप सिद्ध झालेलं नाही. त्विशाच्या आई वडिलांनी तिच्या मृतदेहाचं दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यात यावं अशी मागणी केली होती. याचं कारण हेच होतं की जिमचा बेल्ट हा पहिल्यांदा शवविच्छेदन करताना पोस्टमॉर्टेम टीमला देण्यात आला नव्हता. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे आणि हा दावा केला आहे की सदर बेल्टवर त्विशाच्या त्वचेचे काही अवशेष आहेत. एम्स रुग्णालयाने जो अहवाल सीबीआयला दिला आहे त्यात हे तपशील आहेत असं सांगण्यात येतं आहे. असं झाल्यास त्विशा मृत्यू प्रकरणात जिम बेल्ट हा मोठा पुरावा ठरू शकण्याची शक्यता आहे.

तपास करणाऱ्या पथकांसमोर काय आव्हान?

जो निष्कर्ष समोर आला आहे त्यामुळे हे सिद्ध होत नाही की त्विशाने आत्महत्या केली की तिला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलं गेलं की तिची हत्या झाली. मात्र तपासकर्त्यांसाठी आता हे शोधणं आव्हान असेल की जिन्मॅस्टिक बेल्टचा उपयोग गळफास लावण्यासाठी केला गेला होता का?

भोपाळ एम्सने दिलेल्या शवविच्छेदन अहवालात काय लिहिलं होतं?

भोपाळ येथील एम्स रुग्णालयाने मे महिन्यात दिलेल्या अहवालानुसार त्विशाच्या मानेवर समांतर अंतरावर दोन खुणा आहेत. नायलॉनच्या बेल्टने तिचा गळा आवळला गेल्याचं दिसतं आहे. मात्र हा बेल्ट ऑटोप्सी दरम्यान AIIMS च्या वैदकीय मंडळाला दिलेला नाही. १२ मे रोजी त्विशाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत तिच्या नवऱ्याच्या घरी आढळला होता. त्यानंतर आता हा शवविच्छेदन अहवाल समोर आला. त्याचप्रमाणे त्विशाच्या शरीरावर बऱ्याच जखमा दिसून येत आहेत असंही शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आलं होतं. पोलिसांनी हा बेल्ट आम्ही नंतर जप्त केला कारण त्विशाचा मृतदेह आम्ही तिच्या घरुन ताब्यात घेतला नाही तर रुग्णालयातून ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला असं स्पष्टीकरणही दिलं आहे. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेत ही बाब तेव्हा स्पष्ट केली होती.