संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होत आहे. त्याच दिवशी तीन कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही माहिती दिली. सरकारच्या या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी आपला प्रस्तावित ट्रॅक्टर मोर्चा स्थगित केला आहे.

तत्पूर्वी, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन केले, ते म्हणाले की कायदे रद्द करण्याचे विधेयक सोमवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सादर केले जाईल. शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेला खटला मागे घ्यावा आणि नुकसान भरपाई या मागण्यांवर तोमर म्हणाले की, हे मुद्दे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात.

सरकारच्या या घोषणेनंतर शेतकरी संघटनांची बैठक झाली, त्यात भविष्याची रणनीती ठरविण्यात आली. बैठकीनंतर, संयुक्त किसान मोर्चाने घोषणा केली की ते सध्या ट्रॅक्टर मार्च मागे घेत आहेत. हा मार्च २९ नोव्हेंबरपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार होता.

पुढील बैठक ४ डिसेंबरला होणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने सांगितले. ४ डिसेंबरपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शेतकरी पुढील रणनीती आखतील. एका शेतकरी नेत्याने सांगितले, “आम्ही २९ नोव्हेंबरला ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती, तेव्हा तीनही कृषी कायदे रद्द केले नव्हते. आता कायदे मागे घेतल्याने आम्ही रॅली न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आमच्या उर्वरित मागण्या केंद्राने मान्य न केल्यास येत्या ४ डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत आम्ही पुढील कृती ठरवू.”