पीटीआय, पोर्ट ऑफ स्पेन
आज भारत संधींची भूमी आहे आणि त्याच्या विकासाचे आणि प्रगतीचे फायदे सर्वात गरजू लोकांपर्यंत पोहोचत असून नव्या भारतासाठी आकाशही अमर्यादा असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते त्रिनिनाद आणि टोबॅगो येथे अनिवासी भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित करीत होते. या वेळी त्यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाचे कौतुकही केले.

पंतप्रधान त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे पोहोचले. १९९९नंतर भारतीय पंतप्रधानांचा कॅरिबियन बेटावरील राष्ट्राचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर आणि इतर अनेक मान्यवरांसह ४,०००हून अधिक लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

भारत लवकरच जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सामील होणार असल्याचे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम संगणनावरील त्याचे अभियान विकासाचे नवीन इंजिन बनत आहेत, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. पंतप्रधानांनी भारतीय अर्थव्यवस्थेची लवचीकता आणि तिची वाढ यावर प्रकाश टाकला.

भारताचा विकास तरुणांमुळे

भारताचा विकास नावीन्यपूर्ण आणि उत्साही तरुणांमुळे होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आज भारत जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्टअप केंद्र आहे. यापैकी जवळजवळ निम्म्या स्टार्टअपमध्ये महिला संचालक असल्याची तसेच जवळपास १२० स्टार्टअप्सना ‘युनिकॉर्न’ दर्जा मिळाला असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. जगातील सुमारे ५० टक्के डिजिटल व्यवहार भारतात होतात, असे ते या वेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी त्यांची भूमी सोडली, पण त्यांचे आत्मे सोडले नाहीत. त्यांनी गंगा आणि यमुना सोडली, पण त्यांच्या हृदयात रामायण वाहून नेले. ते फक्त स्थलांतरित नव्हते. ते एका शाश्वत संस्कृतीचे दूत होते. त्यांच्या योगदानाचा या देशाला फायदा झाला आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान