पीटीआय, श्रीहरिकोटा

भारतात खासगीरित्या विकसित करण्यात आलेले पहिले रॉकेट ‘विक्रम-१’ चे शनिवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. स्कायरूट एरोस्पेस कंपनीने ‘मिशन आगमन’ या नावाने ही मोहीम राबवली. सुमारे सात मजली इमारतीइतक्या उंचीचे हे रॉकेट शनिवारी दुपारी १२.०५ वाजता श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण तळावरून आकाशात झेपावले.

काही संभाव्य तांत्रिक अडथळ्यांची तपासणी करण्यासाठी या रॉकेटच्या प्रक्षेपणास काही काळ विलंब झाला. त्यानंतर हे रॉकेट ४५० किमी उंचीवरील निम्न पृथ्वी कक्षेत यशस्वीपणे स्थापित झाले. यामध्ये स्कायरूटच्या स्कोपबरोबरच ग्रहा स्पेस, कॉस्मोसर्व्ह, डीक्यूब यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचाही समावेश आहे.

या रॉकेटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तलिखितातील ‘वंदे मातरम’ असा संदेश असलेले पोस्टकार्ड आकाशात पाठवण्यात आले. याशिवाय एक विशेष १८ कॅरेट सोन्यातील रॉकेटची प्रतिकृती, अभियंते, शास्त्रज्ञ आणि भारतीय अंतराळवीरांची माहिती व शुभेच्छापत्रेही या मोहिमेतून अंतराळात पोहोचली. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई, शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण आणि माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या लहान शिल्पकृतींचाही त्यात समावेश आहे. देशाच्या विज्ञान आणि अंतराळ प्रवासात योगदान देणार्‍या या तीन महान व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हे पेलोड तयार करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

इस्रोकडून सात अंतराळ मोहिमांचे नियोजनभारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चालू आर्थिक वर्षात किमान सात अंतराळ मोहिमा राबविण्याची तयारी केली आहे. पुढील प्रक्षेपण दोन महिन्यांच्या आत करण्यात

येणार आहे. इस्रोचे दोन उपग्रह तयार असून आणखी पाच ते सहा उपग्रह अंतिम टप्प्यात आहेत. आगामी कार्यक्रमामध्ये ‘गगनयान’ ही मानवरहित मोहीम तसेच विविध उपग्रहांच्या प्रक्षेपणाचा समावेश आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली.

हा क्षण देशाच्या अंतराळ प्रवासातील निर्णायक आहे. देशाच्या खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवीन क्षितिजे उघडत असून नवनिर्मितीला गती देत आहे. हे यश असंख्य तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि निर्भयपणे नवनिर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित करेल. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल स्कायरूट एरोस्पेसच्या चमूचे अभिनंदन. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान