scorecardresearch

Pulitzer Prize: अफगाणिस्तानमध्ये मरण पावलेल्या भारताच्या दानिश सिद्दिकींना ‘फोटोग्राफीचा नोबेल’; ‘हा’ फोटो ठरला सर्वोत्तम

अफगाणिस्तानात १६ जुलै २०२१ रोजी स्पिन बोल्दाक भागात वृत्तांकन करताना दानिश यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला

danish siddiqui pulitzer prize
सोमवारी करण्यात आली या पुरस्कारांची घोषणा (फाइल फोटो)

अफगाणिस्तानमध्ये गतवर्षी जुलैमध्ये कर्तव्य बजावताना ठार झालेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांना फोटोग्राफी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. फिचर फोटोग्राफी विभागामध्ये दानिश यांना यंदाचा ‘पुलित्झर पुरस्कार २०२२’ प्रदान केला जाणार आहे. दानिश यांच्यासहीत चार भारतीयांना हा बहुमान यंदा हा बहुमान देण्यात येणार आहे. ‘पुलित्झर पुरस्कार’ हा फोटोग्राफीमधील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. दानिश यांच्या कामाचा या पुरस्काराच्या माध्यमातून मरणोत्तर सन्मान केला जाणार आहे.

नक्की पाहा हे फोटो >> कुणी करतंय आईचं सांत्वन तर कुणी पुसतंय अनोळखी व्यक्तीचे डोळे; अंगावर काटा अन् डोळ्यात पाणी आणणारे पुलित्झर विजेत्या दानिश यांनी करोना लाटेदरम्यान टीपलेले फोटो

काय म्हटलंय पुलित्झरने फोटोसंदर्भात…
दानिश यांचे रॉयटर्स वृत्तसंस्थेमधील सहकारी अदनान अबिदी, साना इशरद माटो आणि अमित दवे यांनाही या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. यासंदर्भातील माहिती सोमवारी देण्यात आलीय. “भारतामधील करोना मृतांची दाहकता दाखवणारे फोटो हे भावनिक जवळीक आणि विध्वंस दाखवणारे असून फोटो पाहणाऱ्याला त्या जागेचे महत्व अखोरेखित करुन सांगणारे आहेत,” असं ‘पुलित्झर’च्या वेबसाईटवर या फोटोंबद्दल म्हटलं आहे.

कोणता आहे हा पुस्कार मिळवणारा फोटो?
२२ एप्रिल २०२१ रोजी नवी दिल्लीमधील एका स्मशानभूमीमध्ये एकाच वेळी अनेक करोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याचा फोटो दानिश यांनी काढला होता. या फोटोमध्ये स्मशानभूमीच्या भिंतींच्या सीमा या लोकवस्तीला लागून असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. करोनाची दाहकता दर्शवणारा फोटो म्हणून हा फोटो तेव्हा चांगलाच चर्चेत आलेला. रॉयटर्स वृत्तसंस्थेसाठी त्यांनी हा फोटो काढलेला. हा फोटो अंगावर काटा आणणारा आहे असं अनेकांनी हा फोटो पाहता क्षणी म्हटलं होतं.

यापूर्वीही झालाय सन्मान
३८ वर्षीय दानिश यांना २०१८ मध्ये रोिहग्या निर्वासितांवरील छायांकनाबाबत पुलित्झर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच भारतीय होते. त्यांचे शिक्षण जामिया मिलिया इस्लामियात झाले होते. तेथे त्यांचे वडील प्राध्यापक होते. दानिश यांचे वडील प्रा. अख्तर सिद्दिकी आणि आई शाहिदा यांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी सध्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात (इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट) तालिबानविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

मुलाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी आई-वडीलांचा अर्ज
आपल्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करावी आणि तालिबानचे नेते आणि उच्चस्तरीय सेनानी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अफगाणिस्तानात १६ जुलै २०२१ रोजी स्पिन बोल्दाक भागात रॉयटरसाठी काम करीत असताना दानिश यांच्यावर हल्ला झाला होता. नंतर तालिबानने त्यांना ताब्यात घेऊन छळ केला, तसेच त्यांना ठार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या दानिश यांच्यासह अफगाणी सैनिकांवर नजीकच्या मशिदीत उपचार करण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Slain photojournalist danish siddiqui among 4 indians honoured with pulitzer prize scsg

ताज्या बातम्या