Wife killed husband with help of lover and snake: पत्नी आणि प्रियकराकडून पतीचा किंवा होणाऱ्या पतीचा खून होण्याच्या घटना देशभरात विविध ठिकाणी घडताना दिसत आहेत. मागच्या वर्षात मेरठमध्ये मुस्कान रस्तोगीचे निळे ड्रम प्रकरण, भोपाळच्या सोनम रघुवंशीचे मेघायल हनिमून प्रकरण गाजले होते. यावर्षी महाराष्ट्रात पुण्यातील सिया गोयल – केतन अग्रवाल प्रकरणामुळे तर देशाला धक्का बसला. आता पुन्हा एकदा मेरठमध्ये एका पतीचा खून झाला असून डोके सुन्न करणारी माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यात पत्नी, तिचा प्रियकर आणि त्यांच्या दोन साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

७ वर्षांपूर्वी प्रेमविवाह, ६ वर्षांचा मुलगा तरीही…

अतुल पनवार (३५) आणि त्यांची पत्नी दामिनी (३०) यांनी २०१९ मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यांना सहा वर्षांचा एक मुलगा आहे. गेल्या चार महिन्यांपासून हे कुटुंब मेरठच्या जे ब्लॉक कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होते. एप्रिल महिन्यात त्यांनी एक खासगी शाळा सुरू केली होती. शुक्रवारी सकाळी अतुल पनवार मृतावस्थेत आढळले.

अतुल यांच्या मृत्यूनंतर पत्नी दामिनीने शेजाऱ्यांना गोळा केले आणि विषारी सापाने दंश केल्यामुळे पतीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. नंतर खोलीत विषारी मण्यार सापही आढळून आला. सकाळी चहा देण्यासाठी पतीच्या खोलीत गेल्यानंतर अतुल निश्चल अवस्थेत आढळला आणि त्यांच्या हात व पायांवर चाव्याच्या खुणा होत्या, असे दामिनीने सांगितले.

ही बातमी पसरल्यानंतर स्थानिक जमू लागले. पोलीस आल्यानंतर अनेकांनी घरात साप पाहिल्याचे सांगितले. दामिनीने पोलिसांना सांगितले की, उकाड्यामुळे रात्री ती आणि मुलगा बाहेरच्या खोलीत झोपले होते. तर अतुल आतल्या खोलीत होता. यानंतर अतुलला तातडीने हस्तिनापूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मग तपासात आला ट्विस्ट

सर्पदंशामुळे झालेला अपघाती मृत्यू म्हणून हे प्रकरण इथेच संपले असते. मात्र अतुलच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे पोलिसांना वेगळ्या दिशेने प्रवास करावा लागला. त्यानंतर उघड झालेला प्रकार धक्कादायक होता. पत्नी, प्रियकर, दोन गारुडी आणि २० लाख रुपयांच्या विम्याची थरारक कहाणी पोलिसांसमोर उघड झाली.

नेमके प्रकरण काय?

अतुल यांच्या वडिलांनी दामिनीचा विरोध डावलून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा आग्रह केला. त्यामुळे पोलिसांना शवविच्छेदन करणे भाग पडले. यानंतर अतुल यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनांची माहिती समोर आली. तसेच दामिनीचे कॉल रेकॉर्ड्सही तपासण्यात आले. कुटुंबातील जवळच्या लोकांचे जबाब नोंदविण्यात आले. चौकशीतून दामिनी तुषार उर्फ निक्की (३५) नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती. हा व्यक्ती त्यांच्या शाळेत ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता.

शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुरावे समोर ठेवल्यानंतर दामिनीने आपला गुन्हा मान्य करत प्रियकर तुषारबरोबर मिळून पतीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दामिनी, तुषार आणि सोनू व उदय या दोन सर्पमित्रांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मेरठचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजीत कुमार यांनी दिली.

गुन्हा कसा घडला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दामिनीने अतुल झोपण्यापूर्वी त्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. तो गाढ झोपी गेल्यानंतर तिने तुषारला बोलावले. तुषार सोनू आणि उदय यांना घेऊन आला. त्या दोघांनी अतुलच्या पलंगावर साप सोडला.

तुषारने पोलिसांना सांगितले की, त्याचे आणि दामिनीचे बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. त्यांनी अतुलला मारण्याचा कट रचला होता. तसेच अतुलचा २० लाख रुपयांचा जीवन विमा हेदेखील त्यांना मारण्याचे कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले. या विम्याच्या रकमेतून सोनू आणि उदय यांना ५ लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, सर्पमित्रांना आगाऊ १५ हजार रुपये देण्यात आले होते.