अनेक प्रयत्न करुनही देशाच्या ऑटो क्षेत्रातील मंदी दूर झालेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून खरेदीदारांकडून मागणी नसलेल्या वाहन विक्रीचा घसरणीचा क्रम सरलेल्या सप्टेंबर महिन्यातही सुरू राहिलेला दिसून आला. ऐन सणांच्या तोंडावर, आठ दिवसांवर दसरा आला असतानाही वाहन विक्रीत अपेक्षित उभारी दिसून आलेली नाही, परिणामी वाहन उद्योगापुढे घसरत्या विक्रीचे आव्हान आहे.

ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्येही वाहन विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं समोर आलं आहे. आघाडीच्या मारुती सुझुकीसह अनेक वाहननिर्मिती कंपन्यांनी सप्टेंबरमध्ये दुहेरी अंकात वाहन विक्री घसरण नोंदविली आहे. सप्टेंबर २०१८ च्या तुलनेत सप्टेंबर २०१९ मध्ये मारुती सुझुकीची देशांतर्गत विक्री २४.८१ टक्क्यांनी घटली आहे. या कालावधीत गेल्यावर्षी कंपनीने १,५३,५५० गाड्यांची विक्री केली होती, तर यावेळी ही विक्री १,१५,४५२ इतकीच झाली आहे. याशिवाय, टाटा मोटर्सच्या विक्रीमध्ये लक्षणीय घट झाली आहे. या महिन्यात टाटाच्या केवळ ८,०९७ गाड्यांचीच विक्री झाली. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात कंपनीने १८ हजार ४२९ गाड्यांच्या विक्रीचा टप्पा ओलांडला होता. म्हणजेच तब्बल ५६.०६ टक्क्यांची विक्रीमध्ये घट झालीये.

याशिवाय, ह्य़ुंदाई मोटर इंडियाला १४.८ टक्के घसरणीसह ४०,७०५ वाहन विक्रीला सामोरे जावे लागले आहे. महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रची वाहन विक्री ३३ टक्क्यांनी कमी होत १४,३३३ झाली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरची वाहन विक्री १८ टक्क्यांनी कमी होत १०,२०३ वर येऊन ठेपली आहे. होंडा कार्स इंडियाची वाहन विक्री ३७.२४ टक्क्यांनी कमी होताना ९,३०१ पर्यंत झाली आहे. एकूणच ऐन सणांच्या तोंडावरही देशातील वाहन उद्योगापुढे घसरत्या विक्रीचे आव्हान कायम राहिले आहे.