मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये आपलं पाहिलं भाषण दिलं. मात्र बायडेन हे भाषण देत असतानाच दुसरीकडे सुरक्षेसंदर्भातील एक मोठा गोंधळ घडला. या गोंधळामुळे सुरक्षा यंत्रणांची एकच तारांबळ उडाली आणि सर्वजण सतर्क झाले. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार घडला तेव्हा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबतच अन्य महत्वाच्या देशांचे प्रमुख नेते न्यूयॉर्कमध्ये होते. हा काय गोंधळ आहे? हा हल्ला तर नाही आणि इतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र नंतर हा प्रकार एका चुकीमुळे घडल्याचं उघड झालं.

अर्थात या गोंधळाचं रुपांतर कोणत्याही मोठ्या दुर्घटनेमध्ये झालं आहे. एक लहान आकाराचं विमान न्यूयॉर्कच्या टेम्पररी फ्लाइट रिस्ट्रिक्शन म्हणजेच टीएफआरमध्ये घुसरलं. यावेळी न्यूयॉर्कमध्ये जगभरातील जवळजवळ १०० देशांचे मोठे नेते उपस्थित होते. सेजना १८२ एअरक्राफ्टने मंगवारी दुपारी दोनच्या आसपास टीएफआरमध्ये प्रवेश केला. त्यामुळेच प्रोटोकॉलप्रमाणे एफ १६ लढाऊ विमाने सतर्क झाली आणि हवेत झेपावली. या विमानांनी पुढील गोंधळ टाळण्यासाठी या छोट्या विमानाला टीएफआरपासून दूर नेलं आणि सुरक्षा यंत्रणांचा जीव भांड्यात पडला.

टीएफआर म्हणजे काय?

न्यूयॉर्कमध्ये सध्या संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीसाठी अनेक नेते जमले आहेत. न्यूयॉर्कमध्ये ज्यावेळी अतिमहत्वाच्या व्यक्तींचा दौरा असतो तेव्हा शहरावरील भाग हा टीएफआर घोषित केला जातो. सोमवारी सायंकाळी चारपासून मंगळवारी पहाटे पावणे चारपर्यंत शहरातील विशिष्ट भागांवरुन कोणत्याही विमानांना उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. हडसन नदीच्या पूर्वेकडील संपूर्ण परिसर नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित करण्यात आलेला. मात्र तरीही एक विमान या प्रदेशावरुन उड्डाण करताना दिसल्याने गोंधळ झाला. तरी वेळीच यंत्रणांनी या विमानाला दूर नेल्याने पुढील गोंधळ टाळण्यात यश आलं.

मोदी रवाना

भारताचे पंतप्रदान नरेंद्र मोदी बुधवारी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये हजेरी लावणार आहेत. त्यांनी हा दौरा अमेरिकेसोबतचे संबंध आणखीन मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केलाय. “मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या आमंत्रणानुसार २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान अमेरिकेचा दौरा करणार आहे. यावेळी मी बायडेन यांच्यासोबत जागतिक राजकीय सामंजस्य आणि दोन्ही दोन्ही देशांच्या क्षेत्रीय हितसंबंधांबरोबरच जागतिक विषयांवर चर्चा करणार आहे,” अशं मोदींनी ट्विटरवरुन स्पष्ट केलंय.

बायडेन काय म्हणाले?

करोना साथ, हवामान बदल, मानवी हक्कांची पायमल्ली यांसारख्या प्रश्नांवर सहकार्याने काम करण्याची गरज असून सध्या अनेक पेचप्रसंगांमुळे जग एका नवीन ऐतिहासिक वळणावर आहे, असे अमेरिकेच्या अध्यक्ष जो बायडेन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील पहिल्या भाषणात मंगळवारी सांगितले. चीनबरोबर संघर्ष सुरू असताना अमेरिका आता नव्या शीतयुद्धाच्या काळात जाऊ इच्छित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचे त्यांनी समर्थन केले आहे. भविष्यकाळ जे सर्वांना बरोबर घेऊन जातील व मुक्तपणे जगू देतील त्यांचा असणार आहे. जे मनगटशाहीने राज्य करू इच्छितात त्यांचा मात्र निश्चिातच असणार नाही, असा सूचक इशारा त्यांनी दिला. चीनचा थेट उल्लेख टाळून ते म्हणाले की, दोन देशात तणाव आहे पण आम्हाला त्यानिमित्ताने नवे शीतयुद्ध सुरू करण्याची इच्छा नाही.