आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोनशिवाय जगण्याची कल्पना करणेही कठीण झाले आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माणूस मोबाईलमध्येच व्यस्त असतो. पण अमेरिकेतील नेथन कोवे नावाच्या एका व्यक्तीने या स्मार्टफोनच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी एक अनोखा प्रयोग केला. नेथनने महिनाभरासाठी आपला महागडा स्मार्टफोन बाजूला ठेवला आणि त्याऐवजी साधा ‘फिल्प फोन’ वापरण्यास सुरूवात केली. या ३० दिवसांच्या अनुभवाने त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले आहे.
मोबाईलची भीती कशी दूर झाली?
नेथनने आपला हा रंजक अनुभव ‘X’ (ट्विटर) वर शेअर केला आहे. प्रयोग सुरू करण्यापूर्वी नेथनला वाटले होते की, स्मार्टफोनशिवाय त्याचे अनेक व्यवहार ठप्प होतील आणि त्याला खूप अडचणी येतील. सुरुवातीला लोकांसमोर साधा फोन वापरताना त्याला थोडे अवघडल्यासारखेही वाटले. पण हळूहळू ही भीती आणि संकोच दूर झाला. नेथनच्या मते, “आपल्याला स्मार्टफोनचे एवढे व्यसन जडलेले असते की, आपलेच मन आपल्याला तो न सोडण्यासाठी वेगवेगळी कारणे देत असते. पण जर तुम्ही मनातून ठरवले, तर स्मार्टफोनशिवाय सहज जगू शकता.”
स्मरणशक्ती वाढली आणि मेंदूला चालना मिळाली
स्मार्टफोन सोडल्यामुळे झालेल्या फायद्यांबद्दल सांगताना नेथन म्हणाला, “आता मी माझ्या मेंदूचा वापर जास्त करत आहे.” त्याच्या साध्या फोनमध्ये मॅपची सुविधा असूनही, तो आता रस्ते आणि नकाशे स्वतः लक्षात ठेवू लागला आहे. डिजिटल गोष्टींपेक्षा त्याचा पेन, कागद आणि पुस्तकांसारख्या प्रत्यक्ष वस्तूंकडील कल वाढला आहे. जेव्हा त्याच्याकडे मोबाईल नसतो, तेव्हा तो स्वतःच्याच विचारांमध्ये रमतो, ज्यामुळे त्याची एकाग्रता वाढली आहे.
मेसेजिंग बंद, थेट फोन कॉल्स सुरू
स्मार्टफोन नसल्यामुळे नेथनचे व्हॉट्सॲप किंवा इतर मेसेजिंग ॲप्सवरील चॅटिंग पूर्णपणे बंद झाले. परिणामी, त्याने लोकांना थेट फोन कॉल्स करणे सुरू केले. नेथनच्या मते, मेसेजवर टाईप करत बसण्यापेक्षा फोनवर बोलणे कधीही उत्तम आहे. यामुळे संवाद अधिक चांगला होतो आणि गैरसमज टळतात.
सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा
नेथनची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. अनेक नेटकऱ्यांनी याचे कौतुक केले, तर काहींनी प्रश्न विचारले की, “आजच्या काळात क्युआर कोड स्कॅन करणे, ऑनलाईन पेमेंट किंवा गुगल कॅलेंडर वापरणे या साध्या फोनमुळे कसे शक्य आहे?”
दुसरीकडे, अनेकांनी नेथनच्या या विचारांचे समर्थन केले. एका युझरने लिहिले, “आजकाल हॉटेलमध्ये गेल्यावर संपूर्ण कुटुंब एकमेकांशी बोलण्याऐवजी मोबाईलमध्ये बुडालेले दिसते, हे पाहून खूप वाईट वाटते. स्मार्टफोन खरोखरच विषासारखे काम करत आहेत.” तर काहींनी डिजिटल जगापासून दूर राहून पुन्हा एकदा साधे घड्याळ, वही-पेन आणि फिल्म कॅमेरा वापरण्याची इच्छा व्यक्त केली.
नेथन कोवेचा हा प्रयोग दाखवून देतो की, स्मार्टफोनमुळे आपण जगाशी जोडले गेलो असलो, तरी स्वतःपासून आणि खऱ्या जगापासून दूर जात आहोत. नेथनने आता कधीही स्मार्टफोन न वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
