Smit Machhar Flydubai pilot Narendra Modi Post : दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबई (flydubai) च्या विमानात कॉकपिटमध्ये दोन वैमानिकांमध्ये झालेल्या थरारक संघर्षात १८० हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवणारे भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार सध्या संपूर्ण जगभरात चर्चेत आहेत. गंभीर जखमी असतानाही त्यांनी दाखवलेल्या अद्भूत शौर्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केलं असून त्यांना ‘रिअल हिरो’ म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट

पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत म्हटले, “कॅप्टन मच्छार हे खरे हिरो आहेत. सर्वात मोठ्या संकटाचा सामना करताना आणि स्वतः गंभीर जखमी झालेले असतानाही, कॅप्टन स्मित मच्छार यांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी अपार धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला. त्यांच्या या शौर्यामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आणि एक मोठी दुर्घटना टळली. संपूर्ण भारताला कॅप्टन मच्छार यांचा अभिमान आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावेत, त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना.”

इस्रायलच्या पंतप्रधानांनीही मानले आभार

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही स्मित मच्छार यांचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, “भारतीय पायलट कॅप्टन स्मित मछ्छर यांच्या असाधारण शौर्याला माझा सलाम. चाकूचे वार होऊन गंभीर जखमी झालेले असतानाही त्यांनी लढा दिला, हल्लेखोराचा प्रतिकार केला, कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि प्रवाशांना व क्रू मेंबर्सना हल्लेखोरावर नियंत्रण मिळवण्यास सक्षम केले, त्यामुळे हवेतच होणारी एक अत्यंत भीषण दुर्घटना टळली. त्यांनी इस्रायली नागरिकांसह इतर देशांच्या नागरिकांचे, म्हणजेच एकूण १७४ जणांचे प्राण वाचवले. मी कॅप्टन मच्छार यांच्या जलद आणि पूर्ण बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. ते एक खरे हिरो (शूरवीर) आहेत.”

नेमकं काय घडलं होतं?

दुबईहून तेल अविव येथे १५० इस्रायली प्रवासी घेऊन जाणाऱ्या फ्लायदुबई कंपनीच्या बोइंग ७३७ विमानामधअये बुधवारी गंभीर प्रसंग घडला. दोन वैमानिकांमध्ये झालेल्या भांडणांनंतर आपत्कालीन इशारे दिले गेले आणि विमान तातडीने सौदी अरेबियामध्ये उतरविण्यात आले. एका वैमानिकाने दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न केल्याची शक्यता इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखविली आहे. यामध्ये सर्व क्रू सदस्यांसह प्रवाशांचा जीव बालंबाल वाचला आहे. विमानात २७ लहान मुलांसह ११७४ प्रवासी होते.

स्मित मच्छार यांच्या प्रकृतीवर लक्ष

फ्लायदुबई या विमानाचे धाडसी भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्या प्रकृतीवर सौदी अरेबियातील भारतीय दूतावास बारीक लक्ष ठेवून आहे. दूतावासाने माहिती दिली आहे की, वैमानिकाला उत्तर-पश्चिम सौदी अरेबियातील तबुक शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दूतावासाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, “त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती मिळणे अद्याप बाकी आहे, परंतु सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. ते त्यांच्या दुखापतींमधून लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी आम्ही आशा करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत आणि सौदी अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या आरोग्याचा पाठपुरावा करत राहू, तसेच त्यांच्या आरोग्यासाठी शक्य ती सर्व मदत करू, असे आश्वासन आम्ही त्यांच्या कुटुंबाला देतो.”