Dubai Tel Aviv plane : दुबईमधून तेल अवीवला जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’ या विमान कंपनीच्या एका विमानात धक्कादायक घटना घडली आहे. विमानामध्ये वैमानिकावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यामुळे विमानात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर हे विमान हायजॅक झाल्याची भीती आधी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या विमानातील दोन्ही वैमानिकांमध्ये झटापट झाल्याची माहिती त्यानंतर समोर आली. या घटनेनंतर हे विमान सौदी अरेबियामध्ये उतरवण्यात आलं.

‘फ्लायदुबई’ या विमान कंपनीच्या विमानामध्ये बुधवारी वैमानिकावर चाकूने हल्ला करण्यात आल्याच्या घटनेत जखमी झालेले वैमानिक हे भारतीय नागरिक असून त्यांचं नाव स्मित मच्छार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ या विमानाचं उत्तर-पश्चिम सौदी अरेबियातील ताबूक विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मात्र, भारतीय वंशाच्या स्मित मच्छार यांच्यामुळे १८० इस्रायली प्रवाशांचे प्राण वाचल्यामुळे वैमानिक मच्छार यांचं कौतुक होत आहे.

या घडामोडी दरम्यानच वैमानिक स्मित मच्छार यांचा एक जुना व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वर्षापूर्वी एका पॉडकास्टमध्ये बोलताना स्मित मच्छार यांनी वैमानिकाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यांबद्दल महत्वाचं भाष्य केलं आणि वैमानिक बनू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोलाचा सल्ला दिला होता. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

स्मित मच्छार यांनी काय म्हटलं होतं?

तरुण वैमानिकांना सल्ला देताना स्मित मच्छार यांनी म्हटलं होतं की, “कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात वैमानिकांनी आपण कुठे उड्डाण करतो किंवा कोणतं विमान चालवतो? यावर लक्ष केंद्रित करू नये. त्याऐवजी तुम्ही का उड्डाण करता किंवा उड्डाण करण्यामागचा उद्देश काय? यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, मी सर्वांना नेहमी हेच सुचवतो”, असं मच्छार यांनी म्हटलं होतं.

“सुरुवातीलाच अट्टाहास करूच नका. नाही, मला इथूनच उड्डाण करायचं आहे असं म्हणू नका. फक्त उड्डाण करा. वैमानिकाचं कौशल्य सुधारणं आणि अनुभव मिळवणं हेच वैमानिक असण्याचं खरं सार आहे. केवळ ऑनलाइन काहीतरी पोस्ट करणं किंवा सेल्फी काढणं यात काही अर्थ नाही. सेल्फीवर नाही तर विमान उडवण्यावर लक्ष दिलं पाहिजे”, असा सल्ला स्मित मच्छार यांनी दिल्याचा जुना व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

नेमकी काय घडलं?

दुबईमधून तेल अवीवला जाणाऱ्या या विमानातील दोन्ही वैमानिकांमध्ये झटापट झाल्याची घटना घडली आहे. Ynet या इस्रायली वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या विमानात काही मुलांसह एकूण १७४ प्रवासी होते. दोन्ही वैमानिकांमध्ये झालेल्या हाणामारीत इमर्जन्सीचा सिग्नल पाठवण्यात आला. त्यानंतर हे विमान सौदी अरेबियात सुखरूप उतरवण्यात आलं. मात्र, ही विमान हायजॅकची घटना नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

स्मित मच्छर कोण आहेत?

दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवला जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’ या विमान कंपनीच्या विमानामध्ये बुधवारी वैमानिकावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. या हल्ल्यात जखमी झालेले वैमानिक हे भारतीय नागरिक असून त्यांचं नाव स्मित मच्छार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ या विमानाचं सौदी अरेबियातील ताबूक विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं.

स्पाईसजेटमध्ये ११ वर्षांचा अनुभव

स्मित मच्छार यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार ते जून २०२२ पासून ‘फ्लायदुबई’च्या बोईंग ७३७ ताफ्यात कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी मुंबईत ‘स्पाईसजेट’ या विमान कंपनीत तब्बल ११ वर्षे सेवा बजावली आहे. स्पाईसजेटमध्ये ते वरिष्ठ कमांडर होते. तसेच नोव्हेंबर २०२० पासून ते ‘लाइन ट्रेनिंग कॅप्टन’ म्हणून इतर वैमानिकांना प्रशिक्षण आणि तपासणीचं काम पाहत होते.