केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या “मी मुलगी आहे आणि मी लढू शकते” या वक्तव्यावरून निशाणा साधला. “घरात मुलगा आहे (राहुल गांधी), पण लढू शकत नाही,” असं म्हणत इराणी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल यांच्यावर टीका केली. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात इराणी यांनी राहुल गांधीसह समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला. “उत्तर प्रदेशातील निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली जाईल अशी आम्हाला आशा आहे. तसेच या निवडणुकीत धोरण आणि विकास आणि लोकशाही मजबूत करण्यावर चर्चा होईल,” असंही इराणी म्हणाल्या.
महिला उमेदवारांना ४० टक्के तिकिटे देण्याच्या प्रियंका गांधींच्या प्रस्तावावर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री इराणी यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, ” त्यांना ६० टक्के तिकिटे महिलांना द्यायची नाहीत, असा याचा अर्थ होतो. राजकारणात आणि लोकशाहीत लोकांनी प्रयत्न करू नये, असे माझे म्हणणे नाही. जय-पराजय हा राजकारणाचा भाग आहे. २०१४ मध्ये माझाही पराभव झाला पण तुमच्या प्रयत्नांवर लोकांचा किती विश्वास आहे हा प्रश्न आहे. तसेच महिला नेत्यांकडून फक्त समाजातील महिला सदस्यांसाठी काम करण्याची अपेक्षा करू नये,” असेही त्या म्हणाल्या.




भाजप ध्रुवीकरणाच्या फॉर्म्युल्यावर काम करते का, असे विचारले असता त्या म्हणाल्या, “या देशातील नागरिक राजकीय विश्लेषण करू शकत नाहीत आणि कोणत्यातरी फॉर्म्यूल्यावर मतदान करतील, असे तुम्हाला वाटते का?” तसेच अखिलेश यादव यांनी ३१ ऑक्टोबरला एका कार्यक्रमात महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना बॅरिस्टर झाले आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि कधीही मागे हटले नाही, असं वक्तव्य केलं होतं. अखिलेश यादव यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत इराणी म्हणाल्या की, ही तुलना पुन्हा दर्शवते की, “मुलं आहेत, पण ते लढू शकत नाहीत. सरदार पटेल अतुलनीय आहेत. पाचशे संस्थानांमध्ये एकतेची भावना जागृत करण्याचे श्रेय सरदार पटेलांना जाते. त्यांचे व्यक्तिमत्व किती महान असेल याची तुम्ही कल्पना करू शकता,” असं इराणी म्हणाल्या.