केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या अमेठीतील खासदार स्मृती इराणी या सध्या एका व्हिडीओमध्ये चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या लोकसभा मतदारसंघातला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये त्या एका पत्रकारावर संतप्त झाल्याचं दिसत आहे. पण असं करताना ज्या वृत्तसमूहाचं नाव घेऊन त्या झापत आहेत, त्या वृत्तसमूहाने तो पत्रकार आमच्या संस्थेचा नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे या व्हिडीओवर उलट-सुलट चर्चा होऊ लागली आहे. यावरून काँग्रेसनं केलेल्या खोचक ट्वीटवर पुन्हा स्मृती इराणींनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
स्मृती इराणींचा एक व्हिडीओ काँग्रेसनं शुक्रवारी ट्वीट केला. या व्हिडीओमध्ये स्मृती इराणी एका पत्रकाराला “माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा अपमान करू नका”, असं बजावताना दिसत आहेत. “मी काय आहे हे मला माहिती आहे. सलोन विधानसभा माझ्या लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. तुम्ही त्या लोकांचा अपमान करू नका. तुम्ही जर माझ्या क्षेत्राचा अपमान कराल, तर मी तुमच्या मालकांना फोन करेन. तुम्ही असाल मोठे पत्रकार, पण तुम्हाला जनतेचा अपमान करण्याचा अधिकार नाही. मी फार प्रेमाने तुम्हाला सांगतेय”, असं स्मृती इराणी म्हणताना व्हिडीओत दिसत आहेत.




काँग्रेसचं खोचक ट्वीट
स्मृती इराणींचा हा व्हिडीओ ट्वीट करत काँग्रेसनं टोला लगावला आहे. “स्मृती इराणीजी पत्रकाराला धमकावत आहेत. मालकाला फोन करून त्याची नोकरी घालवण्याचा विचार आहे. असं वाटतंय पत्रकारानं विचारलं असेल १३ रुपयात साखर कधी मिळेल? किंवा गॅस-सिलेंडरच्या किंमती कमी कधी होणार? किंवा महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर तु्म्ही गप्प का? उत्तर देता आलं नाही, तर धमकी द्यायला लागल्या. स्मृती इराणीजी हे प्रेम नाही”, असं काँग्रेसनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
स्मृती इराणींचं प्रत्युत्तर
काँग्रेसच्या ट्वीटला स्मृती इराणींनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. “हे दिव्य प्राणी, तुमचं पुन्हा दर्शन घेऊन मी धन्य झाले. अमेठीच्या जनतेचा अपमान करू नका, हे मी सांगत होते. पण कदाचित तुम्हाला समजलं नसेल. तुम्ही अमेठीच्या जनतेचा अपमान सहन करू शकता, मी नाही. आणि प्रश्नांचं म्हणाल, तर सांगा माजी खासदारांशी (राहुल गांधी) कुठे चर्चा करायची आहे? साखरच काय, डाळ, पिठाचा भावही सांगेन”, असं इराणी ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.
वृत्तसमूहाचं स्पष्टीकरण
एकीकडे काँग्रेस आणि स्मृती इराणी यांच्यात या व्हिडीओवरून कलगीतुरा रंगला असताना, दुसरीकडे ज्या माध्यमसमूहाचं नाव घेऊन स्मृती इराणींनी संबंधित पत्रकाराला सुनावलं आहे, त्या समूहानं हा पत्रकार आमच्याशी संबंधित नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. “स्मृती इराणी आणि एका पत्रकाराच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. पण त्यातील विपिन यादव नावाचे पत्रकार आमच्याशी संबंधित नाहीत. अमेठी लोकसभा मतदारसंघात आमचा पूर्णवेळ पत्रकार नाही. स्टिंगरही नाही”, असा खुलासा या माध्यम समूहानं केला आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या सत्यासत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.