विमानतळावर बॅगेत किंवा खिशात लायटर लपवण्याचा प्रयत्न तुमच्या अंगलट येऊ शकतो. सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी लायटर लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची रवानगी आता थेट पोलीस ठाण्यात करण्याचा निर्णय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने घेतला असून यामुळे लायटर लपवणाऱ्यांचे विमान चुकू शकते.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) देशभरातील विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. ‘हिंदूस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार यापूर्वी बॅगेत किंवा खिशात लायटर लपवून नेण्याचा प्रयत्न केल्यास सीआयएसएफकडून संबंधित प्रवाशांकडून लेखी माफी घेतली जायची. मात्र आता या प्रकरणात कठोर भूमिका घेण्याचा निर्णय सीआयएसएफने घेतला आहे. विमानतळावर तपासणीदरम्यान बॅगेत, खिशात लायटर आढळल्यास संबंधित प्रवाशाची चौकशी केली जाईल. यात त्या प्रवाशाने जाणूनबुजून बॅगेत लायटर लायटर लपवल्याचे उघड झाले तर संबंधित व्यक्तीची रवानगी पोलीस ठाण्यात केली जाईल, असे सीआयएसएफमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या प्रवाशावर गुन्हा दाखल होणार नाही, मात्र त्याची डायरीत नोंद करुन समज देऊन त्याला सोडले जाणार आहे. यामुळे त्या व्यक्तीचे विमान चुकेल आणि तो पुन्हा अशी चूक करणार नाही.

गेल्या महिन्यात रांची- दिल्ली विमानात एक प्रवासी प्रवासादरम्यान सिगारेट ओढत होता. प्रवाशाकडे लायटरही सापडले होते. तर अन्य एका घटनेत प्रवाशाच्या घडाळ्यात लायटर असल्याचे समोर आले होते. या सर्व घटनांची सीआयएसएफने गंभीर दखल घेतली आहे.

भारतात विमानात लायटरवर बंदी असली तरी अन्य देशांमध्ये अशा स्वरुपाची बंदी नाही, असे सांगितले जाते. लॅपटॉपमधील सीडी ड्राइव्ह किंवा बिस्कीटचे पुडे, वाईन बॉटलच्या आत, किंवा परफ्यूम बॉटलमधून लायटर विमानात नेण्याचे प्रकार समोर येतात, याकडे एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले आहे. विमान प्रवासात स्वच्छतागृहात सिगारेट ओढण्याचे प्रतापही प्रवाशांनी केल्याचे समोर आले होते. लायटरमुळे निर्माण होणारा धोका प्रवाशांनी लक्षात घेण्याची गरज आहे, असे अधिकारी सांगतात.

लायटरच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सीआयएसएफने आणखी एक प्रस्ताव तयार केला आहे. यानुसार अरायव्हल हॉलजवळ (आगमन कक्ष) एक केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव सीआयएसएफने तयार केला आहे. या केंद्रावर प्रवाशांना डिपार्चरच्या वेळी जमा केलेले लायटर मिळू शकतील. डिपार्चरच्या वेळी जे प्रवासी लायटर जमा करुन जातील त्यांचे लायटर दुसऱ्या प्रवाशांना दिले जातील. यामुळे जमा झालेल्या लायटरचे काय करायचे हा प्रश्न निर्माण होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.