अमेरिकेच्या टेहळणी कार्यक्रमाची लक्तरे वेशीवर टांगणारा एडवर्ड स्नोडेन हा मॉस्कोतून गायब झाला आहे. खरेतर तो मॉस्कोतून क्युबाला जाणार होता, त्यासाठी त्याने विमानाचे बुकिंगही केले होते, पण तो फ्लाइटच्या वेळी विमानात बसण्यासाठी आला होता, पण चेक इननंतर गायब झाला. आता या परिस्थितीचा फायदा घेत स्नोडेनला परत मायदेशी पाठवण्याची मागणी अमेरिकेने केली आहे. स्नोडेन याने राष्ट्रीय सुरक्षा संस्थेची गुपिते फोडल्याने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी तो डोकेदुखी ठरला आहे. परंतु स्नोडेन हा ठरलेल्या विमानाने न जाता दुसऱ्याच विमानाने रशियाबाहेर पळाला असावा असे समजते.
हाँगकाँगहून स्नोडेन रशियाला आला व तेथून तो एरोफ्लोटच्या विमानाने हवानाला जाणार होता व नंतर इक्वेडोरला जाऊन आश्रय घेणार होता, पण तो विमानात बसण्यासाठी आलाच नाही.
रशियाच्या ‘इंटरफॅक्स’ या वृत्तसंस्थेने असे म्हटले आहे, की स्नोडेन हा हवानाच्या फ्लाइटमध्ये नव्हता हे अगदी निश्चित आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो रशियातूनही पळाला आहे.
स्नोडेन हा हाँगकाँग येथून रविवारी मॉस्कोला आला होता. तत्पूर्वी त्याने हाँगकाँगमध्ये अमेरिकेच्या ‘प्रीझम’ या गुप्तचर कार्यक्रमाची माहिती जगासमोर उघड केली होती, अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा संस्था नागरिकांचे फोन व इंटरनेटची माहिती कशाप्रकारे चोरते याचे पुरावेच त्याने जगासमोर मांडले होते. एवढेच नव्हेतर ब्रिटनमध्येही त्यांची जीसीएचक्यू ही गुप्तचर संस्था कशाप्रकारे माहिती चोरते व ती अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेला पाठवते याचे भांडाफोड त्याने केले होते.
रशिया व चीन यांनी स्नोडेनला ताब्यात दिले नाहीतर त्यांच्याबरोबरचे संबंध बिघडतील असा इशारा अमेरिकेने याअगोदरच दिला आहे.
ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जे कार्नी यांनी सांगितले, की रशियाने आता स्नोडेनला परत अमेरिकेला पाठवावे हाच एक मार्ग आहे.
स्नोडेन याने एक रात्र मॉस्कोच्या शेरेमेटयेवो विमानतळाजवळील एरवी फारसे प्रसिद्ध नसलेल्या कॅप्सूल हॉटेलमध्ये काढली, असे रशियन अधिका-यांनी सांगितले. विकीलिक्सच्या कार्यकर्त्यां सारा हॅरिसन त्याच्यासमवेत होत्या. तो मॉस्कोतून हवानाला जाणार होता. त्याने चेक इनही केले होते. त्याला आसन क्रमांकही मिळाला होता, पण नंतर नाटय़मय घडामोडीत मॉस्कोच्या विमातळावरून ते विमान स्नोडेनशिवायच उडाले. त्यात अनेक पत्रकारही होते, पण त्यांची निराशा झाली. स्नोडेनचा आसन क्रमांक १७ ए असा होता, पण ते आसन रिकामेच होते असे एएफपीच्या प्रतिनिधीने सांगितले. स्नोडेन अगोदरच रशिया सोडून गेला असावा व दुस-या विमानाने तो पळून गेला असे माहीतगार सूत्रांनी सांगितले.