scorecardresearch

शांतता नोबेल पुरस्कारासाठी स्नोडेनच्या नावाची शिफारस

अमेरिकेच्या टेहळणी कार्यक्रमाची गोपनीय माहिती फोडून खळबळ माजविणाऱ्या एडवर्ड स्नोडेन याला शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा,

अमेरिकेच्या टेहळणी कार्यक्रमाची गोपनीय माहिती फोडून खळबळ माजविणाऱ्या एडवर्ड स्नोडेन याला शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा, अशी शिफारस नॉर्वेच्या माजी मंत्र्यांनी नोबेल समितीकडे एका पत्राद्वारे केली आहे.
दुसरा देश आणि तेथील नागरिकांवर पाळत ठेवण्याचा प्रकार करून काही देशांनी टेहळणी करण्याची परिसीमा गाठली होती त्यांचा पर्दाफाश केल्याबद्दल स्नोडेन याला नोबेल पुरस्कार द्यावा, असे माजी मंत्री बार्द वेगर सोल्हजेल यांनी  स्पष्ट केले आहे.
नक्की काय घडले आहे, त्याची कल्पना स्नोडेन याने जनतेला करून दिली आणि त्यामुळे सरकारच्या विश्वासार्हतेबाबत जाहीर चर्चा झाली. शांतता प्रस्थापित करण्यासाठीची हीच मूलभूत गरज आहे. स्नोडेनने जी गोपनीय माहिती फोडली त्या सर्व माहितीबद्दल त्याच्या नावाची शिफारस केलेली नाही तर आधुनिक टेहळणी कार्यक्रमाचे स्वरूप आणि तांत्रिक बाबी त्याने उघड केल्याबद्दल त्याच्या नावाची शिफारस केली आहे, असे सोल्हजेल आणि त्यांचे सहकारी स्नोर व्हॅलेन यांनी समितीला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
ज्या पद्धतीने आधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात आला आणि टेहळणीची जी परिसीमा गाठण्यात आली त्यामुळे जगभरातील जनता सुन्न झाली आणि त्यामुळेच जगभर त्याबाबत चर्चा झाली, असेही सोल्हजेल आणि व्हॅलेन यांनी आपल्या नामांकनाच्या शिफारसपत्रात म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2014 at 12:06 IST

संबंधित बातम्या