Anna Hazare breaks silence on Sonam Wangchuk hunger strike: सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू करून २१ दिवस झाले आहेत. आज २१ व्या दिवशी केंद्र सरकारने त्यांना बळजबरीने आंदोलन स्थळावरून उचलून रुग्णालयात दाखल केले, असा आरोप करण्यात येत आहे. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर सरकारची दडपशाही चालू असल्याचा आरोप करत आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान आता २० दिवसांपासून मौन बाळगून असलेल्या अण्णा हजारेंनीही या आंदोलनावर भूमिका मांडली आहे. CJP कडून जवळपास तीन आठवड्यांपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर हे आंदोलन चालू असून शनिवारी सोनम वांगचुक यांना बळजबरीने आंदोलन स्थळावरून हटवल्यामुळे त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
अण्णा हजारे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर भाष्य केले. “सरकारने वांगचुक यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नये. त्यांच्या मागण्यांवर हो किंवा नाही, असे उत्तर द्यावे. किमान चर्चा करण्यात तरी काय हरकत आहे?”, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.
शनिवारी सकाळी जंतर-मंतर येथे साध्या वेषात आलेल्या पोलिसांनी आंदोलकांची दिशाभूल करून सोनम वांगचुक यांना उचलून दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयातही आपण अन्नग्रहण किंवा इतर औषधे घेणार नसून उपोषणावर ठाम राहणार असल्याचा संदेश सोनम वांगचुक यांनी आपल्या पत्नीच्या माध्यमातून दिला.
अण्णा हजारे माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, “सोनम वांगचुक उपोषण करत असताना त्यांना उचलून रुग्णालयात दाखल केले गेले. सलोख्याने प्रश्न सुटत असतात. चर्चेविना प्रश्न सुटणार नाहीत. चर्चा करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा. सरकारने सामंजस्याने प्रश्न सोडवावेत. बळजबरी केली तर परिस्थिती बिकट होते.”

अण्णा हजारेंचे विधान का महत्त्वाचे?
काँग्रेसप्रणीत सरकार केंद्रात असताना लोकपाल कायद्याच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी २०११ साली दिल्लीत उपोषण केले होते. ११ दिवस चाललेल्या या उपोषणाची दखल तेव्हाच्या काँग्रेस सरकारने घेतली होती. तसेच आंदोलकांशी चर्चाही केली होती. मात्र सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे सरकारने सपशेल दुर्लक्ष केले असून ते दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे शांत का आहेत? असाही प्रश्न उपस्थित होत होता. त्यामुळे त्यांचे विधान महत्त्वाचे ठरते.
Ralegan, Maharashtra: Social activist Anna Hazare says, "During Sonam Wangchuk’s hunger strike, he was taken away and admitted to a hospital… This is a matter concerning society, and as much as possible, the situation should be handled peacefully. If there is any forceful… pic.twitter.com/5OBmLFrGvU
— IANS (@ians_india) July 18, 2026
अण्णा हजारेंनी बोलावे, काँग्रेसची मागणी
“देशात लोकशाही संपवून हुकूमशाही सुरू झाली आहे. आपली चूक मान्य करूनही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत. सत्ता ही सत्तेसाठी नसून जनतेसाठी असते, हे सरकारने विसरू नये”, अशा शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली होती. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा त्यांनी आज कोल्हापूर येथील आंदोलनात व्यक्त केली होती.
