Social Media Reels Stunts : सध्याच्या काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला असून आता सोशल मीडियावर रील्स आणि व्हिडीओ पाहणं सामान्य झालं आहे. त्यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते तरुण आणि वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकजण रील्स पाहत असतो. मात्र, करमणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या या रिल्समधून किंवा रिल्स बनवण्यासाठी आणि त्यामाध्यमातून लाईक्स, फॉलोअर्स वाढवण्यासाठी तरुणांमध्ये जीवघेण्या स्टंटची क्रेझ वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, तरुणांमध्ये रील्समुळे जीवघेण्या स्टंटची क्रेझ कशी वाढतेय? लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी तरुण जीवघेण्या धोक्यांना कसं खतपाणी घालत आहेत? तसेच रिल्ससाठी स्टंटची क्रेझ वाढण्यामागची कारणं काय आहेत? लाईक्स, फॉलोअर्स की आणखी काही? रील्सच्या नादात स्वत:चा जीव गमवावा लागल्याच्या घटना कुठे-कुठे घडल्या आहेत? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सोशल मीडियावरील नवनवीन ट्रेंड्सवर सध्या अनेकांचं लक्ष असतं. या ट्रेंडनुसार अनेकजण गाणी, रील्स, व्हिडीओ बनवत असतात. भरपूर प्रसिद्धी मिळावी यासाठी अनेक तरुण कोणत्याही थराला जायला तयार असतात. त्यामध्ये अनेकदा तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालत असल्याचे अनेक व्हिडीओ किंवा रिल्स आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या स्टंटमुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागल्याचंही पाहायला मिळालं आहे.
रील्समुळे जीव गमावाल्याच्या घटना कुठे-कुठे घडल्या?
गाझियाबाद : बाईकवर रील्स बनवताना तरुणीचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये रविवारी पहाटे अशीच एक हृदय पिळवून टाकणारी घटना घडली. एका भरधाव स्पोर्ट्स बाईकचा भीषण अपघात होऊन १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा मित्र सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. गाझियाबादच्या एनएच ९ या महामार्गावर ही दुर्घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, एक तरुणी स्पोर्ट्स बाईक चालवत होती, तर तिचा मित्र मागे बसला होता. हे दोघेही बाईकवरून थरारक रील बनवत असताना वेगावरील नियंत्रण सुटलं आणि बाईक थेट दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, बाईकचा चक्काचूर झाला. अपघाताच्या काही सेकंद आधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेवेळी दोघांनीही हेल्मेट घातलेलं नव्हतं आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी केलेला हा स्टंट जीवावर बेतला.
गुडगाव : रील्स बनवताना स्टंट जीवावर बेतला?
फरीदाबादच्या सिरोही गावात चार मित्रांना घेऊन जाणारी एसयूव्ही गाडी सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळल्याची एक घटना नुकतीच समोर आली. यामध्ये एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की हा अपघात अतिवेगामुळे झाला. मात्र, सूत्रांच्या दाव्यानुसार, हे तरुण स्टंट रील्सचं चित्रीकरण करत होते. यावेळी अपघात झाला आणि त्यात एकाचा जीव गेला.
हुबळी : ‘सडन ब्रेक’ स्टंट करताना तरुणाचा मृत्यू
कर्नाटकमधील हुबळीमध्ये एका १५ वर्षीय तरुणाचा कारने धडक दिल्याने मृत्यू झाला. या घटनेवेळी हे दोघे मित्र सडन ब्रेक स्टंटचं चित्रीकरण करत होते. मात्र, गाडीचा ब्रेक न लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटलं आण यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली.
उत्तर प्रदेश : घरातच रील्स बनवताना अपघात
लखनौमधील एक १८ वर्षीय तरुण त्याच्याच घरात फाशीच्या दृश्याची रील्स बनवत होता. मात्र, ही रिल्स बनवत असताना त्याचा तोल गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
गुवाहाटी : पुलावरून पडून तरुणाचा मृत्यू
आसामच्या गुवाहाटीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एक तरुण पुलाच्या रेलिंगवर रील्स बनवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, यावेळी एका १८ वर्षीय तरुणाचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मध्य प्रदेश : ट्रेनवर रील्स बनवताना तरुणाचा मृत्यू
मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एका थांबलेल्या मालगाडीवर रील्स बनवताना तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा तरुण थांबलेल्या मालगाडीवर रील्स बनवत होता. मात्र, यावेळी विजेचा धक्का लागला आणि १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
रील्सचं वेड धोकादायक कसं ठरतंय?
दरम्यान, तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मची वाढलेली क्रेझ आणि कंटेंट व्हायरल करण्यासाठी लागलेलं वेड आणि त्या माध्यमातून लाईक्स, फॉलोअर्स आणि प्रसिद्धीची हाव यामुळे तरुण अनेकदा कोणत्याही परिणामांचा विचार न करता धोकादायक स्टंट करण्यास प्रवृत्त होतात.
