नवी दिल्ली: समाजमाध्यम हे अराजक आहे. त्यावर बंदीची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक एस. गुरुमूर्ती यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त प्रेस कौन्सील ऑफ इंडियातर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका मांडली. अर्थात त्यांच्या या भूमिकेला कौन्सीलच्या काही सदस्यांनी विरोध केला.

चीनने समाजमाध्यमे संपवली आहेत. आपल्याकडेही सर्वोच्च न्यायालयाने समाजमाध्यमांच्या भूमिकेबाबत चिंता व्यक्त केल्याचे गुरुमूर्ती यांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हा आपल्याला बंदी आणावी लागेल. फेसबुकशिवाय आपण राहू शकणार नाही काय असा सवाल त्यांनी केला. समाजमाध्यमांमुळे म्यानमार, श्रीलंकेत अशांतता निर्माण झाल्याची उदाहरणे असल्याचे गुरुमूर्ती यांनी स्पष्ट केले. नंतर प्रश्नोत्तराच्या वेळी बंदी घालणे कठीण वाटत असले तरी अराजकता रोखलीच पाहिजे. प्रेस कौन्सीलने या मुद्दय़ावर सखोल अभ्यास करावा अशी सूचना गुरुमूर्ती यांनी केली. जयशंकर गुप्ता व गुरबिर सिंग यांनी गुरुमूर्ती यांच्या सूचनेला विरोध केला. प्रत्येक काळात एक माध्यम असते. समाजमाध्यमाच्या अनेक सकारात्मक बाबी असल्याचे गुरबिर यांनी नमूद केले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याचे स्थान आहे हे स्वीकारलेच पाहिजे असे त्यांनी सांगितले. त्रिपुरातील पत्रकारांना झालेल्या अटकेबाबत गुरुमूर्ती यांनी मौन बाळगल्याबद्दल शुक्ला यांनी सवाल केला.