आजच्या काळात सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी तरुण पिढी कोणत्या थराला जाऊ शकते, याचा एक अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक प्रत्यय मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यात आला आहे. नॅशनल हायवेवर चालत्या दुचाकीवर हातात पिस्तूल नाचवत ‘रील’ बनवण्याच्या नादात झालेल्या भीषण अपघातात तीन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना १४ एप्रिल रोजी पन्नी पथरिया भागात घडली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बेला गावातील तीन तरुण भाऊ एका पल्सर मोटारसायकलवरून प्रचंड वेगाने जात होते. यावेळी ते सोशल मीडियासाठी एक व्हिडिओ (रील) शूट करत होते. व्हिडिओमध्ये एक तरुण चालत्या गाडीवर गावठी पिस्तूल हवेत फडकवताना दिसत आहे. समोरून येणाऱ्या एका ट्रक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असतानाच, रस्त्याच्या कडेला विटांनी भरलेली एक ट्रॉली उभी होती. दुचाकीचा वेग इतका जास्त होता की चालकाला नियंत्रण मिळवता आले नाही आणि ही दुचाकी थेट उभ्या ट्रॉलीवर मागून आदळली.
अपघाताची भीषणता आणि साखळी अपघात
हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील तिन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची नावे उपलक्ष कोल (१७), अमरीश कोल (२२) आणि हेमराज कोल (१७) अशी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या तिघांच्या पाठीमागे दुसऱ्या एका दुचाकीवर त्यांचे दोन मित्र या स्टंटचा व्हिडिओ शूट करत होते. पहिल्या दुचाकीचा अपघात होताच, त्यामागून येणारी दुसरी दुचाकीही त्याच ट्रॉलीला जाऊन धडकली.
या साखळी अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील प्रशांत द्विवेदी आणि प्रदीप द्विवेदी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने संजय गांधी रुग्णालय, रेवा येथे हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांची कारवाई आणि इशारा
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी साची पाठक यांनी सांगितले की, “केवळ सोशल मीडिया कंटेंट बनवण्यासाठी जीव धोक्यात घालून वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.”
रस्त्यावर वाहन चालवताना स्टंट करणे किंवा मोबाईलचा वापर करणे कायद्याने गुन्हा असून तो जीवावर बेतू शकतो. एक छोटीशी चूक संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभराचे दुःख देऊन जाऊ शकते. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
