scorecardresearch

समाजमाध्यमांचा लोकशाहीतील हस्तक्षेप थांबवावा!; सोनिया गांधींचे केंद्र सरकारला आवाहन; निवडणुकीत दुरुपयोग होत असल्याचा आरोप

देशातील निवडणुकीच्या राजकारणात समाजमाध्यमांचा दुरुपयोग केला जात असून समाजमाध्यमांचा लोकशाहीतील हस्तक्षेप थांबवला पाहिजे, असे आवाहन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष व खासदार सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला केले.

नवी दिल्ली : देशातील निवडणुकीच्या राजकारणात समाजमाध्यमांचा दुरुपयोग केला जात असून समाजमाध्यमांचा लोकशाहीतील हस्तक्षेप थांबवला पाहिजे, असे आवाहन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष व खासदार सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला केले. लोकसभेत बुधवारी शून्य प्रहरात सोनिया गांधी यांनी समाजमाध्यमांपासून लोकशाही असलेल्या धोक्यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला.

फेसबुक, ट्विटर व तत्सम समाजमाध्यम कंपन्यांकडून भारतातील राजकारणात हस्तक्षेप केला जातो. या कंपन्या सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करून या माध्यमांचा गैरवापर करत आहेत. देशातील लोकशाहीसाठी ही बाब धोकादायक असून हा गैरवापर केंद्र सरकारने थांबवला पाहिजे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि त्यांच्याशी छुप्या पद्धतीने मदत करणाऱ्या संस्था, कंपन्या, संघटनांकडून विविध समाजमाध्यमांचा वापर लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी केला जात आहे. पण, जगातील बलाढय़ समाजमाध्यम कंपन्या सर्व राजकीय पक्षांसाठी लोकांपर्यत पोहोचण्याची समान संधी उपलब्ध करून देतातच असे नाही, आता त्यांचा दुजाभाव उघड झालेला आहे, असे सांगत सोनिया गांधी यांनी परदेशी वृत्तपत्रांमध्ये फेसबुक व अन्य समाजमाध्यम कंपन्यांच्या राजकीय ‘हस्तक्षेपा’ची उदाहरणेही दिली.

द्वेषमूलक मजकुरांना थारा न देण्याच्या स्वत:च्या धोरणाकडे फेसबुक अनेकदा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते असे आढळले असून ही कंपनी सत्ताधारी राजकीय पक्षाला झुकते माप देते, ही बाब ‘वॉलस्ट्रीट जर्नल’ या इंग्रजी वृत्तपत्राने लेखांमधून दाखवून दिली आहे. अलीकडेच अल-जझीरा या वृत्तवाहिनीने तसेच, ‘रिपोर्टर्स कलेक्टिव्ह’सारख्या स्वतंत्रपणे पत्रकारिता करणाऱ्या वृत्तसंकेतस्थळांनीदेखील फेसबुकच्या माध्यमातून राजकीय पक्षांसाठी वा नेत्यांसाठी छुप्या जाहिराती कशा केल्या जातात, हेही उघड केले आहे. फेसबुकचा वापर करून राजकीय पक्षांसाठी बनावट वृत्तसंकेतस्थळे सुरू केली जातात, त्यावर राजकीय पक्षांसाठी जाहिराती केल्या जातात. निवडणुकीचे नियम धाब्यावर बसवून अशा जाहिरात करणे पूर्णत: चुकीचे आहे. पण, अशा बनावट संकेतस्थळांवरील जाहिरातींवर फेसबुक कारवाई करत नाही असा अनुभव आहे. फेसबुक स्वत:च्याच नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोपही सोनिया गांधी यांनी केला.  

या समाजमाध्यमांचा देशातील लोकशाहीत होत असलेला हस्तक्षेप रोखण्याची गरज आहे. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन या प्रश्नाचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. केंद्रात कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरी लोकशाही टिकवण्यासाठी आणि सामाजिक एकतेला तडा जाऊ नये यासाठी सत्ताधारी पक्षाने प्रयत्न केले पाहिजेत, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

‘सामाजिक एकता धोक्यात’

  • सत्ताधाऱ्यांकडे कानाडोळा करण्याच्या फेसबुकच्या वृत्तीमुळे सामाजिक एकता धोक्यात येऊ लागली आहे.
  • तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळय़ांचीच मने कलुषित केली जात आहेत. त्यांच्या मनात द्वेष निर्माण केला जात आहे.
  • चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे. त्यासाठी छुप्या जाहिरातींचा वापर होत आहे.
  • समाजमाध्यमांचा कसा गैरवापर केला जातो, याचे फेसबुकसारख्या कंपन्यांना पक्के माहीत आहे. पण, मोठय़ा कॉर्पोरेट कंपन्या, सत्ताधारी आणि फेसबुकसारख्या बलाढय़ समाजमाध्यम कंपन्या यांचे एकमेकांमध्ये हितसंबंध गुंतलेले असल्याचे स्पष्ट होत आह़े

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Social media stop interfering democracy sonia gandhi appeals central government allegations election fraud ysh

ताज्या बातम्या