पीटीआय, नवी दिल्ली
गुजरातमधील गुंड सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी कौसरबी आणि त्याचा साथीदार तुलसीराम प्रजापती या तिघांच्या कथित बनावट चकमक प्रकरणातील सर्व २२ आरोपींची सुटका करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधातील याचिकेची तपासणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. या खटल्यामध्ये ९२ साक्षीदार उलटल्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली.
सोहराबुद्दीन शेख आणि अन्य दोघांच्या कथित बनावट चकमक प्रकरणात गुजरात आणि राजस्थानातील मिळून २१ पोलीस आणि एका फार्महाऊसचा मालक असे २२ जण आरोपी होते. मुंबईतील सीबीआय न्यायालयाने डिसेंबर २०१८मध्ये याप्रकरणी निकाल देताना सर्व २२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्याविरोधात रुबाबुद्दीन शेख आणि नायबुद्दीन शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने ७ मे रोजी दिलेल्या निकालात रुबाबुद्दीन आणि नायबुद्दीन यांची याचिका फेटाळत सीबीआय न्यायालयाचा निकाल कायम ठेवला होता. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सोहराबुद्दीनचा भाऊ नायबुद्दीन शेख याने याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने नोटीस बजावली.
आरोपींना निर्दोष ठरवण्याच्या निकालाशी संबंधित काही निवडक साक्षीदारांचे जबाब तपासले जातील, असे न्यायालयाने सूचित केले. आम्ही यासंबंधीच्या नोंदी मागवणार नाही, तुम्हाला जे तीन-चार जबाब महत्त्वाचे वाटतील ते आम्हाला द्या. आम्ही निर्दोष सोडण्याच्या निकालाची तपासणी करू, असे सरन्यायाधीशांनी सांगितले. तर न्या. बागची यांनी २२ साक्षीदार उलटल्याची बाब विचारात घेतली पाहिजे, विशेषतः खटला निष्पक्ष आणि न्याय्य होता का याचे मूल्यमापन करण्याची गरज आहे का, असे निरीक्षण नोंदवले.
पूर्वपीठिका
सोहराबुद्दीन, कौसरबी आणि प्रजापती हैदराबादहून सांगलीला प्रवास करत असताना २२ नोव्हेंबर २००५च्या रात्रीनंतर पोलिसांच्या पथकाने तिघांना कथितरित्या ताब्यात घेतले होते. सोहराबुद्दीन, कौसरबी या दाम्पत्याला आणि प्रजापतीला वेगवेगळ्या वाहनांतून नेण्यात आले होते. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, सोहराबुद्दीन हा अहमदाबादजवळ २६ नोव्हेंबर २००५ रोजी झालेल्या चमकमकीत ठार झाला. त्यामध्ये गुजरात आणि राजस्थान पोलिसांचा सहभाग होता. कौसरबीची तीन दिवसांनंतर हत्या झाल्याचा आरोप आहे. तर उदयपूर मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आलेला प्रजापती कथित चकमकीचा महत्त्वाचा साक्षीदार होता. तो गुजरात-राजस्थान सीमेवर २७ डिसेंबर २०२६ रोजी पोलीस चकमकीत मारला गेला.
