कोटय़वधी रुपयांच्या सौर ऊर्जा घोटाळाप्रकरणी गंभीर आरोप असल्याने आणि त्याची चौकशी प्रलंबित असल्याने केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माकपने शुक्रवारी केली.
या घोटाळ्याच्या सूत्रधारांशी चंडी यांचे संबंध असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले असून त्याची न्यायालयीन चौकशी प्रलंबित असल्याने चंडी यांनी त्वरित पायउतार व्हावे, असे पक्षाच्या पॉलिट ब्यूरोने एका निवेदनात म्हटले आहे. या प्रश्नावर राज्य सरकार कोणतीही पावले उचलत नसल्याच्या निषेधार्थ निदर्शने करणाऱ्या निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचाही पक्षाने तीव्र निषेध केला आहे.
सौर ऊर्जेचा तोडगा सुचवून अनेकांना कोटय़वधी रुपयांना गंडा घातल्याचा आरोप दोन आरोपींवर ठेवण्यात आला आहे. चंडी यांच्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचे आरोपींशी संबंध असल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लाभले.