पीटीआय, दुबई

सोमालियामध्ये समुद्री चाच्यांनी ताब्यात घेतलेल्या एका इंधन टँकरवरील पाच कर्मचाऱ्यांची हत्या केली. यात एक जण जखमी झाला आहे. मृतांमध्ये एका भारतीय खलाशाचा समावेश आहे. दरम्यान, आफ्रिकेच्या सुरक्षा दलांनी या जहाजाचा ताबा पुन्हा मिळवला आहे. केनियातील भारतीय उच्चायुक्तालयाने बुधवारी एका समाजमाध्यम पोस्ट प्रसिद्ध करत ‘एमटी ऑनर’वरील भारतीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त केला.

‘पुंटलँड मेरीटाइम पोलीस फोर्स’ने राबवलेल्या मोहिमेदरम्यान या कर्मचाऱ्यांची समुद्री चाच्यांकडून हत्या करण्यात आली.

मंगळवारी झालेल्या या हल्ल्यात तीन पाकिस्तानी, एक भारतीय आणि एका म्यानमारमधील नागरिकाचा मृत्यू झाला, अशी माहिती ‘पुंटलँड मेरीटाइम पोलीस फोर्स’ने दिली. पुंटलँड हे सोमालियातील अर्ध स्वायत्त राज्य आहे.

अमेरिकेचे निर्बंध असलेले आणि इरिट्रियाचा ध्वज असलेले ‘सिबू १’ हे तेलवाहू जहाज गेल्या जवळपास महिनाभराहून अधिक काळ सागरी चाच्यांच्या ताब्यात होते. गेल्या आठवड्यात सोमालियाच्या पुंटलँड भागातील सागरी पोलिसांनी हे जहाज चाच्यांच्या ताब्यातून मुक्त केले. तर टोगोचा ध्वज असलेले ‘एमटी युरेका’ हे जहाज मंगळवारी सोडण्यात आले. ‘एमटी सिबू १’वर १६ आणि ‘एमटी युरेका’वर चार भारतीय खलाशी होते.

‘जहाजावरील इतर सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असल्याचे वृत्त आहे. यात ‘एमटी सिबू १’ आणि ‘एमटी युरेका’वरील खलाशांचाही समावेश आहे, ज्यांची अलीकडेच सुटका करण्यात आली आहे.