संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका केली. नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील नव्या सदस्यांची ओळख करुन देत असताना विरोधकांनी गदारोळ घातला असताना दलित, ओबीसी, महिला मंत्री झाल्याने काही जण आनंदी नाहीत असं ते म्हणाले. दरम्यान यावेळी गदारोळ घालणाऱ्या विरोधकांवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतापल्याचं पहायला मिळालं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान लोकसभेत विरोधकांचा गदारोळ

मोदी नेमकं काय म्हणाले –

“मला वाटलं होतं की, इतक्या महिला, दलित, आदिवासी मंत्री झाल्याने संसदेत उत्साह असेल. यावेळी कृषी, ग्रामीण, ओबीसी समाजातील सहकाऱ्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पण काही लोक महिला, ओबीसी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मंत्री होण्याची संधी दिल्याने आनंदी नाहीत. यामुळे त्यांची ओळख करुन देण्याची परवानगी ते देत नाही आहेत,” असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतापले

विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचं सांगत संताप व्यक्त केला. चांगल्या पंरपरा तोडल्या जात आहेत. सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या संसदेत हे वागणं योग्य नाही असं त्यांनी विरोधकांना सुनावलं. ओम बिर्ला निधन झालेल्या नेत्यांसाठी शोक प्रस्ताव मांडत असतानाही विरोधक गदारोळ घालत असल्याने ते संतापले.

“लस घेऊन बाहुबली व्हा”

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशन सुरु होण्याआधी माध्यमांशी संवाद साधला. करोनाविरोधातील लढाईत आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. यावेळी त्यांनी लस घेताच करोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असं सांगत लस घेण्याचं आवाहन केलं.

Monsoon session of Parliament : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून

“मी आशा करत आहे की तुम्ही सगळ्यांनी लसीचा कमीत कमी एक डोस घेतला असेल. तरीही तुम्ही करोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करा. लस ही हातावर(बाहू) देण्यात येते आणि जेव्हा लस हातावर देण्यात येते तेव्हा तुम्ही बाहुबली बनता. करोनाविरुद्धच्या लढाईत जर तुम्हाला बाहुबली बनायचे असेल तर तुम्हाला हातावर लस घ्यावी लागेल. आतापर्यंत ४० कोटी पेक्षा जास्त लोकं करोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत. पुढे ही हे काम जोरात सुरु राहिल,” असे मोदींनी म्हटलं.