गुजरातच्या सोमनाथ मंदिरात अमृत पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिराच्या भव्य कळसाला, देशभरातील ११ पवित्र तीर्थक्षेत्रांमधील पाण्याने अभिषेक करण्यात येतोय. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावत सोमनाथ मंदिरात आयोजित ‘अमृत पर्व’ कार्यक्रमात सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी मंदिरात पूजा केली. भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिराच्या भव्य कळसाला देशभरातील ११ पवित्र तीर्थक्षेत्रांतील पाण्याने अभिषेक करण्यात आला. या अभिषेकासाठी एका विशेष कलशाचा वापर करण्यात आला. या सोहळ्यादरम्यान, ११ तीर्थक्षेत्रांतील पवित्र पाणी मंदिराच्या ९० मीटर उंच कळसावर ओतण्यात आले. आपण जाणून घेऊ या मंदिराची खासियत आणि वैशिष्ट्ये काय आहेत? या मंदिराशी जोडलेली अख्यायिका काय हे देखील जाणून घेऊ.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९५१ मध्ये केला होता मंदिराचा जीर्णोद्धार

सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९५१ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि आज ११ मे २०२६ रोजी त्याचा ७५ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. हे भव्य मंदिर सनातन धर्म आणि संस्कृतीवरील अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे. हे मंदिर हजारो वर्षापूर्वीचे असून गझनीचा महंमद, अलाउद्दीन खिलजी आणि औरंगजेब यांसारख्या आक्रमकांनी हे मंदिर अनेकवेळा लुटले आणि नष्ट केले. परंतू ते पुन्हा उभारण्यात आले.

मंदिराला सोमनाथ हे नाव का मिळालं?

सोमनाथ या नावामागे अत्यंत प्राचीन कथा सांगितली जाते. चंद्रदेव अर्थात “सोम” यांना दक्ष प्रजापतीने शाप दिला होता. त्या शापामुळे चंद्राचे तेज नष्ट होऊ लागले. तेव्हा चंद्रदेवांनी प्रभास क्षेत्रात भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला शापमुक्त केले. त्या स्मरणार्थ चंद्रदेवांनी येथे सुवर्णमंदिर उभारले, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या स्थानाला “सोमनाथ” म्हणजे “सोमाचा नाथ” असे नाव प्राप्त झाले. स्कंदपुराण, शिवपुराण आणि अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये सोमनाथ क्षेत्राचे वर्णन आलेले आहे. प्रभास क्षेत्र हे श्रीकृष्णांनी देहत्याग केलेले स्थान म्हणूनही ओळखले जाते.

सोमनाथ मंदिरावर कुठले हल्ले झाले?

इ.स. १०२५ मध्ये अफगाणिस्तानातील आक्रमक गझनीने याने सोमनाथ मंदिरावर भयंकर आक्रमण केले. त्या काळात सोमनाथ मंदिर अतिशय श्रीमंत असल्याची माहिती गझनीला मिळाली होती. लुटीच्या उद्देशाने त्याने हजारो सैनिकांसह भारतावर स्वारी केली. इतिहासातील वर्णनांनुसार, मंदिराचे रक्षण करण्यासाठी हजारो हिंदूंनी प्राणांची आहुती दिली. गझनीने मंदिरातील संपत्ती लुटली, मंदिराचा विध्वंस केला. असे म्हटले जाते की, या लुटीत प्रचंड प्रमाणात सोने, हिरे आणि रत्ने नेण्यात आली. परंतु विशेष गोष्ट म्हणजे, मंदिर उद्ध्वस्त झाले तरी हिंदू समाजाची श्रद्धा संपली नाही. पुढील काळात अनेक राजांनी पुन्हा मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला. सोमनाथ मंदिरावर इतिहासात अनेक वेळा आक्रमणे झाली. दिल्ली सल्तनत आणि इतर इस्लामी आक्रमकांनीही मंदिर उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. तरीही प्रत्येक वेळी हिंदू समाजाने मंदिर पुन्हा उभे केले. यामुळे सोमनाथ हे “अखंड श्रद्धेचे प्रतीक” बनले. मंदिराच्या पुनर्बांधणीमागे केवळ धार्मिक भावना नव्हती, तर भारतीय संस्कृती जपण्याचा निर्धार होता.

सोमनाथ मंदिरावर कुणी कधी हल्ले केले?

१० व्या शतकात गझनीच्या मोहम्मदाने १७ वेळा मंदिरावर स्वारी केली आणि मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

१३११ मध्ये अल्लाउद्दीने खिलजीने दिलेल्या आदेशानंतर या मंदिरावर हल्ले झाले.

१३२६ मध्ये मोहम्मद तुघलक याने या मंदिरावर हल्ला केला होता.

१३९५ मध्ये दिल्लीच्या जफर खानने या मंदिरावर हल्ला केला होता.

१४५१ मध्ये महूमद बेगडाने या मंदिरावर हल्ला करुन लूट केली होती.

१७ व्या शतकात औरंगजेबाने या मंदिरावर हल्ला केला आणि लूट केली होती.

Somnath Temple News
सोमनाथ मंदिरावर आत्तापर्यंत कितीवेळा हल्ले झाले? (फोटो-सोशल मीडिया)

सोमनाथ मंदिराची वैशिष्ट्ये काय?

  • अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे सोमनाथ मंदिर भव्य आहे.
  • सोमनाथ मंदिर चालुक्य शैलीत बांधले आहे.
  • सोमनाथ मंदिर परिसरात असलेला बाणस्तंभ अंटार्क्टिकापर्यंत दक्षिणेकडील एकमेव स्तंभ असल्याचे म्हटले जाते.
  • सोमनाथ मंदिराचे शिखर सुमारे १५५ फूट उंच आहे.
  • सोमनाथ मंदिराच्या शिखरावरील ध्वजाची उंची २७ फूट आहे.
  • सोमनाथ मंदिरातील सायंकाळची आरती आणि लाईट अँड साऊंड शो हे प्रमुख आकर्षण आहे.

सोमनाथ मंदिराचं गूढ काय?

सोमनाथाचं प्राचीन मंदिर हे ५६ लाकडी खांबावर उभं होतं

सोमनाथ मंदिरातील मुख्य मूर्ती ही कुठल्याही आधारशिवाय अधांतरी होती.

प्राचीन सोमनाथ मंदिराचं छत सोन्याचं होतं

या मंदिरात ४० मण सोन्याची घंटा होती

१७ स्वाऱ्यांमध्ये गझनीच्या मोहम्मदाने सहा टन सोनं लुटलं होतं.