Karnataka Crime News : देशभरात दररोज विविध ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. दरोडा, खून, जाळपोळ, हाणामारी, लैंगिक अत्याचार, हल्ला, चोरी, हिंसा अशा प्रकारच्या घटना वेगवेगळ्या शहरात घडल्याच्या बातम्या समोर येतात. आता कर्नाटकमध्ये देखील एक अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
कर्नाटकातील एका व्यक्तीने स्वत:च्या वडिलांची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर वडिलांची हत्या केल्यानंतर त्यांचा अपघाती मृत्यू असल्याचं भासवण्याचा प्रयत्न देखील मुलाने केला. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमुळे या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला आणि पोलिसांनी मुलाला अटक केली. या संपूर्ण घटनेमुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कर्नाटकातील एका व्यक्तीला त्याच्या वडिलांच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली. या व्यक्तीने वडिलांची हत्या केल्यानंतर वडिलांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचं भासवलं. ही घटना ११ मे रोजी तुमकुरु जिल्ह्यात घडली. सुरुवातीला विजेच्या धक्क्याने अपघाती मृत्यू झाल्याचं सर्वांनी मान्य केलं. मात्र, सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि सर्वांनाच धक्का बसला. या संदर्भातील वृत्त टाइम्स नाऊने दिलं आहे.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या व्हिडीओत रात्री १:४५ च्या सुमारास मुलगा आणि वडील या दोघांमधील शाब्दिक वाद होतो आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर हिंसक संघर्षात झाल्याचं दिसून येत आहे. तसेच याच वादामुळे वडिलांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे.
सीसीटीव्हीनुसार, ५५ वर्षीय नागेश हे वादाच्या वेळी त्यांचा मुलगा सूर्या याला थप्पड मारताना दिसल्याचं वृत्तात म्हटलं आहे. नागेश चप्पल काढून सूर्याला मारतात. मात्र, यावेळी दोघातील वाद आणखी टोकाला जातो, त्यानंतर सूर्याने हातात एक पांढरा कापडा घेतलेला दिसतो आणि वडील मागे हटताच सूर्याने अचानक वडिलांचा गळा आवळला आणि जमिनीवर ढकललं, यातच त्यांचा मुत्यू झाल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं. दरम्यान, या प्रकरणा आता पोलिसांनी मुलाला अटक केलं असून पुढील तपास करण्यात येत आहे.