Goa BJP leader son Soham Naik Arrested for Sexual Assault: कर्नाटकमधील प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरण काही काळापूर्वी गाजले होते. माजी पंतप्रधानांच्या नातवाने अनेक महिलांचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडीओ तयार केल्याप्रकरणी खासदार असलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाला अटक करण्यात आली होती. असेच एक प्रकरण आता गोव्यात उघड झाले आहे. दक्षिण गोव्यातील एका भाजपाच्या नेत्याच्या मुलावर २५ ते ३० अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात २२ वर्षीय सोहम नाईकला ताब्यात घेतले आहे.
आरोपी सोहम नाईक हा कुडचाडे नगरपालिकेच्या नगरसेवकाचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. सोहमने अनेक अल्पवयीन मुलींचे शोषण करून त्यांचे व्हिडीओ बनविले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली. ही घटना समोर आल्यानंतर आता परिसरात खळबळ माजली आहे.
तीन वर्षांपासून अत्याचार करत असल्याचा आरोप
मदेगल-काकोरा येथील रहिवासी असलेल्या सोहम नाईकला सोमवारी ताब्यात घेण्यात आले. यानंतर कुडचडे पोलीस ठाण्याबाहेर स्थानिक रहिवासी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी गर्दी करत निदर्शन केले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मागच्या तीन वर्षांपासून मुलींचे शोषण करत होता, असे सांगितले जात आहे. मात्र या घटनेत एकाही पीडितेने तक्रार न दिल्यामुळे हा प्रकार समोर आला नाही.
दारूच्या नशेत झाला प्रकरणाचा उलगडा
काही दिवसांपूर्वी सोहम नाईक आपल्या मित्रांसमवेत एका पार्टीत सहभागी झाला होता. यावेळी नशेच्या अमलाखाली असताना त्याने आपल्या मित्रांना पीडित मुलींचे व्हिडीओ दाखवले. यानंतर या प्रकरणाची चर्चा बाहेर पसरली.
याची चर्चा परिसरात पसरल्यानंतर स्थानिकांमध्ये असंतोष पसरला. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी होऊ लागली. आरोपी भाजपाच्या नेत्याचा मुलगा असल्यामुळे प्रकरण दाबले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करत अनेकांनी आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला. यामुळे पोलिसांनी आरोपी सोहम नाईकला ताब्यात घेतले.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती तपासली जात आहे. या गुन्ह्यात आणखी काही लोकांचा समावेश आहे का? याचाही तपास केला जात आहे. या घटनेनंतर दक्षिण गोव्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. पीडित मुलींना न्याय मिळावा, अशी मागणी केली जात आहे.
“We have registered three cases against the accused in the sex scandal, Soham Sushant Naik. The investigation is ongoing, and we will proceed with the help of scientific methods. If anyone else wishes to file a complaint, they are encouraged to come forward”, says South Goa SP. pic.twitter.com/kPtjzJR1pU
— Herald Goa (@oheraldogoa) March 24, 2026
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, दोन पीडितांनी जबाब नोंदविले आहेत. त्यानंतर हे प्रकरण आता क्राइम ब्रँचकडे वर्ग करण्यात आले आहे. त्याप्रमाणे आरोपी नाईक विरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
