Kerala Murder Case: Son takes revenge after 8 years of mental trauma and sleepless nights : एखादा वाद काळानुरूप विसरला जातो किंवा काळ निघून गेला की प्रकरण शांत होतं. पण या प्रकरणात दिवसेंदिवस राग वाढत जात होता. परिणामी आठ वर्षांनंतर वडिलांच्या हत्येचा सूड उगवण्याकरता एका व्यक्तीने वडिलांची हत्या केलेल्या व्यक्तीचीच हत्या केली. केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील अय्यमपुझा गावात घडली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं.

माजी सैनिक कलमपरंबन पॉली आणि त्यांचा जुना शेजारी किलुक्कन जोस हे पूर्वीपासूनचे एकमेकांचे सख्खे शेजारी होते. २०१८ मध्ये शेतातील तलावातून पाणी घेण्याच्या वादातून जोसने पॉली यांच्या ७५ वर्षीय वडील जोस यांना मारहाण केली होती, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जोसला गेल्यावर्षी शिक्षा झाली होती. पण त्याने आधीच तुरुंगवास भोगल्यामुळे त्याला पुन्हा जेलमध्ये जावे लागले नाही. हीच गोष्ट पॉली यांना बोचत होती. जोसने वाद टाळण्यासाठी मांजप्रा येथे भाड्याने घर घेऊन राहत होता. पण नियतीने त्याला पॉलीसमोर आणले आणि या वादाचा रक्तरंजित शेवट झाला.

पॉली यांच्या वडिलांची हत्या झाल्यानंतर या गावात खळबळ माजली होती. परंतु, गेल्या काही काळापासून या वादाबाबत गावात शांतता होती. तसंच, हा वाद मिटवण्यासाठी स्थानिक चर्चने पुढाकार घेतला होता. दरम्यान, पॉली सध्या त्यांच्या मुलीच्या लग्नात व्यस्त होते. त्यामुळे हे प्रकरण मिटलं असावं, असा समज निर्माण झाला. मात्र, सोमवारी पॉली यांनी जोसवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली, तेव्हा संपूर्ण अय्यमपुझा गाव हादरून गेले.

नेमकं काय घडलं?

माजी पंचायत सदस्य जया म्हणाले, “दोघांमध्ये यापूर्वी छोटे-मोठे खटके उडाले होते. पण स्थानिक पाद्रींनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती सुधारली होती. जोसनेही आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला होता. पॉली जुन्या गोष्टी विसरून पुढे जाईल असे सर्वांना वाटले होते, पण त्याने असे पाऊल उचलले याचे आश्चर्य वाटते.

हत्या केली अन् पोलिसांत गुन्ह्याची कबुलीही दिली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जेव्हा न्यायालयाने ५४ वर्षीय जोसला वडिलांच्या हत्येप्रकरणी केवळ एक वर्षाची शिक्षा सुनावली, तेव्हापासून पॉलीच्या मनात संताप खदखदत होता. ही शिक्षा त्याला अपुरी वाटत होती. सोमवारी संध्याकाळी जोस आपल्या ११ वर्षांच्या मुलासोबत मांजप्रा येथील नदीत अंघोळ करत होता. तिथून दुचाकीवरून जाणाऱ्या पॉली यांनी जोसला पाहिले आणि ते थांबले. त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली आणि पॉलीने आपल्याकडील बंदुकीतून जोसवर गोळी झाडली. जोसने पळण्याचा प्रयत्न केला, पण पॉली यांनी आणखी दोन गोळ्या झाडल्या. जोसचा नदीतच मृत्यू झाला. घाबरलेला मुलगा ओरडत घरी पळाला, तर पॉलीने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

स्टेशन हाऊस ऑफिसर जोसी टी.के. यांनी सांगितले की, “पॉली यांना आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही. जोसला पाहताच त्याच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली. तो एका खाजगी सुरक्षा एजन्सीत एटीएम कॅश रिफिलिंगचे काम करत असल्याने त्याच्याकडे बंदूक होती.”

वडिलांची हत्या सतत डोळ्यांसमोर दिसायची

पॉली यांनी पोलिसांना सांगितले की, “वडिलांच्या हत्येचा फोटो डोळ्यासमोर आला की मला अन्न जात नसे आणि झोपही लागत नसे. माझ्या वडिलांना न्याय मिळाला नाही असे मला सतत वाटत होते.” यासाठी पॉली यांनी कोची येथील रुग्णालयात समुपदेशन (counselling) घेतल्याचेही सांगितले, पण सूडाची भावना कमी झाली नाही.